पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषय बनला. त्याचं चित्रण नामदेव कांबळे लिखित 'राघववेळ' (१९९३), ‘ऊनसावली' (१९९७), ‘मोराचे पाय' (१९९७), ‘सांजरंग', 'सेलझाडा' (२००५) या कादंब-यांत पाहावयास मिळतं. नामदेव कांबळे हे नव्वोदत्तरी कालखंडातील आघाडीचे कादंबरीकार. त्यांच्या ‘राघववेळ' कादंबरीस सन १९९५ चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. खडतर परिस्थितीतून वर आलेला हा लेख त्याचं अनुभवविश्व कादंब-यांतून आलं आहे. साधा चौकीदार, सहायक म्हणून काम करणारा हा माणूस शिक्षक होतो. हा सारा संघर्ष, जगण्याची उलघाल हेच त्याचं विश्व होतं. मातंग समाजाचं यथार्थ वर्णन त्यांच्या कादंब-यातून प्रत्ययास येतं. यातील स्त्री जीवनही विदारक आहे. विदर्भी बोलीच्या वापराने कादंबरीवर प्रादेशिकतेचा ठसा आपोआप उठतो. या काळातले असेच दमदार कादंबरीकार म्हणजे अशोक पवार, ‘इळनमाळ’, ‘बिराडा’ आणि ‘तसव्या' (२०१३) अशा कादंब-यांतून हद्दपारित, हक्कवंचित समाजाचं चित्रण करतात. अरुण साधूनी म्हटल्याप्रमाणे, "चाबकाचे एकामागोमाग फटकारे मारीत अशोक पवार भारतीय समाजव्यवस्था, मानवी संस्कृती आणि मध्यमवर्गीय सुसंस्कृत समाजाची व्यवस्थेबाहेर हद्दपार केलेल्या समूहाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारी क्रूर, निबर, संवेदनहीन वृत्ती यांवर प्रकाशझोत टाकतात." ‘उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड ‘वडार वेदना'तून वडार समाजाचे दैन्य व भोग शब्दबद्ध करतात. 'वकिल्या पारधी' हा पारधी समाजाचे पारंपरिक अपराधित्व दूर करण्याचा प्रयत्न होय. लक्ष्मण गायकवाडांच्या कादंबच्या म्हणजे वर्गाचं, जातसमूहाचं वैशिष्ट्यपूर्ण चित्रण हे ठरून गेलेलं दिसतं. ल. सि. जाधव यांच्या ‘पीळ' आणि 'सुंभ' तसेच डॉ. शरणकुमार लिंबाळेच्या ‘दंगल’ आणि ‘हिंदू' कादंबच्या समकालाचे बदलते सामाजिक पर्यावरण आपल्यासमोर ठेवतात. या सर्वांतून लक्षात येते की, दलित कादंबरी नित्य जातजाणिवा प्रमाण मानून वर्गचित्रण करीत राहिल्याने ती सामूहिक दु:खाचा प्रातिनिधिक हुंकार व उद्गार बनून राहते. तीच तिची खरी ओळख होय. नवव्या दशकात दलित मराठी कादंबरीत मोलाचे योगदान देणारे माधव कोंडविलकर यांनी 'अजून उजाडायचं आहे' (१९८१), ‘अनाथ' (१९८१), ‘छेद' (१९८३), 'झपाटलेला' (१९८४), ‘देशोधडी' (१९९८) अशा सरस कादंब-या लिहून दलित, वंचितांचे ग्रामीण भागात होणारे शोषण, त्यांचं देशोधडीला लागणारं जगणं ज्या पद्धतीने चित्रित केले आहे, ते वाचकांना अंतर्मुख करते आणि अस्वस्थही!

 दलित आत्मकथा हा मराठी दलित साहित्यास मान्यता व लोकाश्रय मिळवून देणारा साहित्यप्रकार होय. या आत्मकथांची पहिली पावले आपणास

मराठी वंचित साहित्य/४९