पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनाथाश्रमातील अनाथ मुलाची कहाणी सांगते; तर 'गावचा टिनोपॉल गुरुजी'तून ते दलित शिक्षकाची व्यथा वेशीवर टांगतात. 'माणुसकीची हाक'मध्ये धर्मपरिवर्तन व समाजोद्धार हा तत्कालीन विचार ते मांडतात. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतर चळवळ प्रेरणा देत असल्याचे स्पष्ट संकेत कादंबरी देते.
 बाबूराव बागूल मुख्त: कथाकार; पण त्यांनी ‘सूड' (१९७0) आणि ‘अघोरी' (१९८०) या दोन कादंब-या लिहिल्या आहेत. ‘सूड' दीर्घकथासदृश कादंबरिका. देवदासी प्रथेतील मुरळी (जानकी ऊर्फ प्रसाद) या कथाकृतीची नायिका. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीमध्ये निरंतर अत्याचाराचं सत्र तिच्यात सुडाची भावना कशी निर्माण करतं याचं विदारक चित्र या लघुकादंबरीत आहे. आगळं विश्वदर्शन करणारी ही कादंबरी विषय नावीन्यामुळे मोठ्या प्रमाणात वाचली गेली. केशव मेश्राम यांनी ‘पोखरण' (१९७९), ‘हकिकत' (१९८०) आणि ‘जटायू' (१९८0) या कादंबरी त्रयीतून आत्मकथन शैलीने विषमतामूलक समाजाचे चित्रण केलं आहे. यातील ‘हकिकत'पेक्षा ‘जटायू' सरस वाटते ती तिच्या कलात्मक विणीमुळे. दलित समाजाचं पशुपातळीवरचं जगणं या कादंब-या प्रत्ययकारीपणे चित्रित करतात. त्यामुळे त्या हृदयाला भिडतात.
 सन १९८0 नंतर नामदेव ढसाळ यांनी ‘हाडकी हाडवळा' (१९८१) आणि 'निगेटिव्ह स्पेस' (१९८७) या दोन कादंब-या लिहून दलित संवेदनेचे नवे पैलू मांडले. अशोक व्हटकरांच्या ‘मेलेलं पाणी', ‘बहात्तर मैल' आणि ‘बगाड' कादंबरीत्रयीने दलित कादंबरीचा पैस विस्तारला. विशेषत: पाणी, अस्पृश्यता यांचा संबंध प्राथमिक तरी त्याची उपलब्धता किती कठीण, पाण्यासाठी दलितांना करावे लागणारे सव्यापसव्य परिणामकारकपणे मांडल्याने यातील ‘बहात्तर मैल'वर चित्रपट होऊन याचे महत्त्व समाजमान्य ठरले. उत्तम कांबळेनी ‘श्राद्ध' लिहन दलित-सवर्णांमधील चालीरीतीने पाळण्यात येणारी जीवघेणी अस्पृश्यता, रिवाजाची व्यर्थता व अमानुषता अधोरेखित केली आहे. यशवंत मनोहरांची ‘रमाई' ही चरित्रात्मक कादंबरी याच काळातील. वि. शि. शिंदेंच्या ‘उद्ध्वस्त'नेपण दलित व्यथांचा पाढा वास्तवदर्शी पद्धतीने प्रस्तुत केला.

 सन १९९० नंतरच्या जागतिकीकरण व आर्थिक उदारतेने समग्र समाजास ग्रासल्याने त्यातून दलित वस्तीही सुटली नाही. नवशिक्षित दलित समाजाचं बदलतं भावविश्व हा या काळच्या दलित कादंबरीकारांना आव्हान देणारा

मराठी वंचित साहित्य/४८