पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लेखक होत. या कथांतून प्रकर्षाने स्पष्ट होणारी गोष्ट म्हणजे बौद्ध सांस्कृतिकता. यातील काही कथात विशेषतः ऊर्मिला पवारांच्या कथांत स्त्रीवाद दिसतो. दलित कथांच्या आजवरच्या चौकटीत या काळातील कथा बसत नाही हीच त्यांच्या बदलाची खूण होय. वैचारिक गोंधळ, द्विमानसिकता अथवा दुभंगलेपण घेऊन येणा-या या कथांना समकालीन समाजवास्तव पकडता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. नीलकंठ शेरेंनी म्हटल्याप्रमाणे, “वैचारिक नूतनता आणि सुस्पष्टतेचा अभाव यांमुळे १९९० नंतरच्या बदलत्या वास्तवाचे जाणिवेच्या आणि दार्शनिकतेच्या पातळीवर ते विश्लेषण करण्यात कमी पडलेले दिसतात." (ललित, ऑगस्ट, २०१३, पृ. ४८)
 एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात गतकाळाप्रमाणे विपुल कथालेखन झाले. जागतिकीकरणात दलित समाजाची झालेली गोची हाच या काळातील कथालेखनाचा कळीचा मुद्दा झाल्याचे लक्षात येते. माधव सरकुंडेंचा कथासंग्रह 'वाडा' (१९९६), दादू मांत्रेकरलिखित ‘बहिष्कृत गोमांतक' (१९९७), प्रकाश मोगलेंचे कथासंग्रह ‘कावस' (१९९९) आणि 'धम्मद्रोही' (२००२), जयराज खुणेचा ‘आगडोंब' (२००१), प्रकाश खरातलिखित ‘अंधाराचा अस्त', प्रा. गौतमीपुत्र कांबळेचा ‘परिवज्रक' (२००४), कुमार अनिलांचा 'पेशवाईत मेलेला पांढरा उंदीर' (२००४), अनिता वाघमारे लिखित ‘वस्तीवरची पोरं' राजेश्वरी कांबळेचा ‘मृदगंध (२००७), प्रज्ञा दया पवार लिखित ‘अफवा खरी ठरावी म्हणून' (२०१०) दीपध्वज कासौंदचा ‘पंचनामा' (२०१०) या नि अशा अनेक कथासंग्रहांतून नव्या शतकाचे जे वास्तव पुढे येते ते उद्ध्वस्त शहरांचं बकालपण आणि खेड्यांचं उद्ध्वस्तपण. या काळची दलित कथा विषय, आशय, प्रश्न, शैली सर्वार्थांनी संमिश्र आहे. शहरांच्या सपाटीकरणात बळी ठरणारा दलित, वंचित या कथांच्या अग्रभागी दिसतो. अस्पृश्यतेची तीव्रता कमी झाल्याचा सुखद प्रत्यय देणाच्या या कथा समाज प्रगल्भ झाल्याची साक्ष देतात; तर दुसरीकडे नव्या शोषण तंत्राचे, (आर्थिक, शैक्षणिक) त्या चित्रण करतात. प्रज्ञा दया पवार आणि गौतमीपुत्र कांबळेच्या कथा कलात्मक आहेत. त्यामागे लेखकांचं वाचन जसं आहे तसं चळवळीची सक्रियतापण. या कथा सामाजिक, सांस्कृतिक कोंडीचं चित्र रेखाटतात. त्यांत बांधीलकीचा भाव आहे आणि दलित वैचारिकतेची प्रतिबद्धताही.

 मराठी दलित कादंबरी ही विभावरी शिरूरकर यांची 'बळी' (१९५०), जयवंत दळवींची 'चक्र' (१९६३), मधू मंगेश कर्णिकांची माहिमची खाडी (१९६९), भा. ल. पाटलांची वस्ती वाढते आहे' (१९७३) सारख्या परित्यक्त स्त्रियांची दु:खं, झोपडपट्टीतील माणसांचं जिणं, इज्जतीचा प्रश्न,

मराठी वंचित साहित्य/४६