पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चित्रं उपस्थित करणा-या या कथा दु:खी, वंचितांच्या अपरिचित जीवनाचा आलेख स्पष्ट करीत दलितांचं जगणं जगावेगळे पण असह्य असल्याची नोंद प्रभावीपणे करतात.
 सन १९८० नंतर केशव मेश्राम यांचा ‘पत्रावळ' (१९८१) कथासंग्रह आला. यातील ‘रक्ती', 'बसमाती', 'चटका', ‘उतारा', 'ऊतमाज'सारख्या कथा दलित समाजाच्या स्थितिशीलतेचे वर्णन करीत जागल्याची भूमिका वठवितात. ‘मोडता', 'हरामोत', बेडूक शिक्षण व्यवस्थेतील विषमता अधोरेखित करतात. दलित आणि पशूमधील अभेद्यता, अद्वैतता चित्रित करणाच्या या कथा दलितांमध्ये अस्मिताभाव आणि भान जागवितात. याच काळात प्रकाशित डॉ. शरणकुमार लिंबाळेचा कथासंग्रह ‘हरिजन' (१९८८), ‘रथयात्रा' (१९९३) मधील कथा उल्लेखनीय अशासाठी वाटतात की त्या एकाच वेळी नागर आणि ग्रामीण दलित समाजाचं समांतर चित्रण करून जाती प्रथेची उघडझाप शब्दबद्ध करतात. 'नाग', 'चट्टा’, ‘धडका', ‘सूर्याच्या वहाणा' मूल्यांच्या पारंपरिक धारणांपुढे प्रश्नचिन्ह उभारून श्लील-अश्लीलतेची सीमारेषा निश्चित करण्याचा आग्रह धरतात. अमिताभ यांचा कथासंग्रह ‘पड' (१९८0) विदर्भातील दलित समाजाचं चित्र रंगवितो. 'पड', 'भिका-याले ओकाच्या', ‘पोळलेल्या पाऊलखुणा' कथांतून अमिताभ जातीयतेची पाळंमुळे समाजात खोल रुजली असल्याचं आपलं निरीक्षण नोंदवितात.

 सन १९९० ला भारतात दोन घटना महत्त्वाच्या ठरल्या. एक देशात संगणक क्रांतीचा प्रारंभ झाला, तर दुसरीकडे आर्थिक उदारवादाचा प्रारंभ होऊन जागतिकीकरणाकडे भारताचा प्रवास सुरू झाला. या बदलाचे दलित समाजावर झालेले परिणाम चित्रित करणाच्या कथांचा वाढता ओघ पुढील दोन दशकांत (१९९० ते २०१०) दिसून येतो. विसाव्या शतकाचा अंत आणि एकविसाव्या शतकाचा उदय असा द्विस्पर्शी काळ हे या दोन दशकांची संक्रमणातील वैशिष्ट्ये चित्रित करणारे कथासंग्रह या काळात प्रकाशित झाले. केशव मेश्रामलिखित ‘कोळीष्टके' (१९९०), तु. लि. कांबळेचे ‘मांजराकाठची माणसं' आणि 'गावठाण' (१९९५), योगीराज वाघमारेंचा ‘पिंपळपान' (२००३), अमिताभ लिखित ‘लंबाटा' (१९९०) आणि ‘अंधारयात्री' (२००१), नामदेव कांबळे लिखित ‘परतीबंद' (१९९४), किशोर घोरपडेंचा ‘घुसमटणी' (२००५), मीनाक्षी मून यांचा 'मेल्डिंग गर्ल', ऊर्मिला पवारांचा ‘हातचा एक' (१९९१), शकुंतला रोकडेलिखित 'एलिझाबेथ (२००१) मधील कथाविषय, आशय, शिल्प, शैली सर्व दृष्टींनी बदलाचे संकेत देणा-या आहेत. हे सारे लेखक १९९० च्या आसपास लिहू लागलेले

मराठी वंचित साहित्य/४५