पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महानगरीय विस्तार इत्यादींच्या पाश्र्वभूमीवर मराठी कादंबरीत आलेला एक नवा प्रवाह होय. अण्णा भाऊ साठेसारख्यांच्या बहुआयामी लेखनाने प्रारंभीच त्याला मोठा वाचक वर्ग लाभला; कारण एकाच वेळी त्यांच्या कादंब-या दलित जाणिवा व्यक्त करीत होत्या, तर दुसरीकडे त्या ग्रामसंस्कृतीचे अस्सलपण भाषा, पात्र, रूढी, परंपरा, रिवाज, समाजभेद व्यक्त करीत होत्या.
 अण्णा भाऊ साठे हे बहुप्रसव कादंबरीकार म्हटले पाहिजे; कारण त्यांनी तब्बल तीन डझन कादंब-या लिहिल्या. कथानकं भिन्न असली तरी त्यांचा साचा व सूत्र ठरलेले असायचे. त्यांच्या पहिल्या ‘फकिरा' (१९५९) कादंबरीस वि. स. खांडेकरांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे. त्यात खांडेकरांनी म्हटलं आहे की, “या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे. जीवनात आग ओकणाच्या हरत-हेच्या गोष्टींचा अनुभव आहे. त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अत्याचाराविरुद्ध बंड उभारणाच्या वृत्तीचा तो पूजक आहे." ‘अलगूज', ‘आवडी', 'माकडीचा माळ', 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'चिखलातील कमळ' या त्यांच्या उल्लेखनीय कादंब-या होत. वरील सातही कादंब-यांवर मराठीत चित्रपट निघालेत हे विशेष. पैकी ‘फकिरा'त मातंग जमातीतील गुन्हेगारीचं चित्रण आहे.
 अण्णा भाऊ साठेच्या कादंब-या दलित, भटक्या, विमुक्त जमातींना जगण्याचं बळ देतात. “माझा दावा आहे की, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे," म्हणणारे अण्णा भाऊ साठे तितक्याच आत्मविश्वासाने आपल्या कादंब-यांतून दलित, वंचित वेदनांना स्वर देतात. कलात्मकता व सामाजिकता यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या कादंब-यांत आढळतो. खुनी, दरोडेखोर, फरारी यांच्याबद्दल सामान्य माणसांत असलेलं आकर्षण या कादंबच्या केवळ भांडवल करीत नाहीत, तर त्या चरित्र, व्यक्तिरेखेमागील त्याचं मन, आकांक्षा, उद्देश स्पष्ट करून त्यांना जनमानस सहानुभूतीने माफही करतो व माणुसकीची मान्यताही देतो.

 शिक्षण, समाजकार्य, वकिली असा विविध अनुभवांचा परिसर लाभलेले शंकरराव खरात यांनी दलित, वंचितांच्या जीवनावर आधारित ‘हातभट्टी (१९७०), ‘झोपडपट्टी' (१९७०), ‘गावचा टिनोपॉल गुरुजी' (१९७१), ‘मसालेदार गेस्ट हाऊस' (१९७४), ‘फुटपाथ नं. १' (१९८०), ‘माझं नाव (१९८७) शिवाय ‘मी मुक्त, मी मुक्त' आणि 'माणुसकीची हाक' सारख्या कादंब-यांतून दलित वस्तीतलं दाहक वास्तव चित्रित केलं आहे. हातभट्टी'तून ते झोपडपट्टी, तिथले दादा, त्यांचे काळे धंदे, अरेरावी, स्त्रियांची छेडछाड रंगवत न पाहिलेलं विश्व वाचकांना दाखवितात. 'मी मुक्त, मी मुक्त

मराठी वंचित साहित्य/४७