पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दारिद्रय, अवहेलना, उपासमारीचं हे जग वाचकांचं मन हेलावून सोडतं. दलित कथाकार रा. ना. शेंडे आपल्या कथांतून एक आगळीच दुनिया साकारतात. ‘सावली' (१९५६), ‘डोंगरमाथ्यावरील दिवा' (१९६०) मधून ते समाजबदलाचा आदर्श चित्रित करतात. लेखकाची भूमिका देशभक्त व समाजसेवकाची दिसून येते. त्यामुळे ते दलित चित्रण असले तरी फारसे प्रत्ययकारी होत नसल्याची खंत अनेक समीक्षकांनी व्यक्त केली आहे. बंधुमाधवांच्या अनेक कथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'प्रबुद्ध भारत' आणि ‘जनता' नियतकालिकातून प्रकाशित झाल्या आहेत. या कथांचा काळ १९५५ ते १९६० आहे. जावे त्यांच्या वंशा', 'कायद्याचा बळी', 'सव्वा रुपया कप', 'दुरून डोंगर साजरे', 'जन्मठेप', ‘आम्ही माणसं आहोत', 'गगनाला गवसणी', 'म्हार जन्माची चित्तरकथा' इ.मधून ते रूढीविद्रोहाची भाषा करतात. देवदासी, ढोर, बौद्ध, महार अशी समाजाची प्रातिनिधिक चित्रे ते रंगवितात. चीड, संताप व्यक्त करणाच्या या कथा प्रेरक आहेत.

 वरील प्रारंभिक कथांनंतर बाबूराव बागूलांच्या कथेने दलित कथासाहित्यात एक नवा कालखंड कलात्मक विकासाच्या अंगानी निर्माण केला. जेव्हा मी जात चोरली होती' (१९६३), ‘मरण स्वस्त होत आहे' (१९६९) हे कथासंग्रह। त्यांच्या प्रतिभासामर्थ्याची प्रचिती देतात. मानवी मनातील राग, द्वेष, बदला, स्पर्धा इत्यादी भाव-भावनांचे चित्रण हा त्यांच्या कथांचा स्थायीभाव आहे. या कथांत सर्व जात, धर्माची पात्रे असतात. त्यामुळे ती कथा समाजचित्र बनते. दलित कथांतील विद्रोहाच्या बीजाचा उगम म्हणून या कथांकडे पाहिले पाहिजे. वामन होवाळांनी मासिकांतून कथा लिहिल्या व पुढे त्यांचे संग्रह झाले. कथालेखनाबरोबर कथाकथन करणारे कथाकार म्हणून त्यांची आगळी ओळख आहे. त्यांच्या कथा आबालवृद्धांपर्यंत सारख्याच पोहोचतात हे विशेष. ‘बेनवाड' (१९७३), 'येळकोट' (१९८५), 'वारसदार' (१९८६), ‘वाटा आडवाटा' (१९८७) तील कथांमधून होवाळ आपल्या उपहासगर्भ शैलीद्वारे दलित समाजाचं दु:ख ज्या सामाजिक विसंगती व विसंवादातून निर्माण होतं त्यावर ते मार्मिकपणे बोट ठेवतात. ही सूक्ष्मता कथेस आगळे परिमाण देते. सामाजिक ढोंगाचं वस्त्रहरण हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य होय. योगीराज वाघमारेंचा उद्रेक' (१९७८), भास्कर चंदनशिवांचा ‘जांभळडव्ह (१९८0), माधव कोंडविलकर लिखित ‘डाळं', ‘काहिली’, ‘निर्मळ', (१९८४) कथासंग्रह, योगेंद्र मेश्रांमांचा ‘रक्ताळलेली लक्तरे' (१९८0), अर्जुन डांगळेचा ‘ही बांधवरची माणसं' (१९७९) याच कालखंडातील उल्लेखनीय कथाकृती होत. या सर्वांतून एक अनोखे जगदर्शन वाचकांना येते. समाजव्यथा, वेदना,

मराठी वंचित साहित्य/४४