पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इत्यादींच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत दलित विकासाचा विचार पोहोचणे शक्य झाले; कारण त्या वेळचा समाज साक्षर नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. शाहीर केरू अर्जुन घेगडे, केरूबुवा गायकवाड, पतितपावनदास, दीनबंधू, राजानंद गडपायले, वामन दादा कर्डक, श्रावण यशवंते, प्रभृतींची कवने, शाहिरी, फटके, पोवाडे यांचे मोल वृत्तपत्र जागृतीइतकेच महत्त्वाचे आहे.
 वरील जागृती व बदलते समाजमन यांचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्यात पडू लागले. प्रा. श्री. म. माटे यांनी ‘अस्पृशष्टांचा प्रश्न' (१९३३) सारख्या ग्रंथातून याच्या विवेचनास प्रारंभ केला. नंतर त्यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग' (१९४१), माणुसकीचे गहिवर' (१९४९) सारख्या कथासंग्रहातून वंचित, उपेक्षितांची व्यक्तिमत्त्वे, व्यक्तिचित्रे साकारली. विभावरी शिरूरकरांनी 'कळ्यांचे नि:श्वास' (१९३३), ‘हिंदोळ्यावर' (१९३४) कथासंग्रह व 'बळी' (१९५0) सारख्या कादंब-यांतून वंचित, उपेक्षित स्त्रिया व गुन्हेगार समजल्या जाणाच्या जाति-जमातिचे प्रश्न मांडले. असे लेखन अनेकांनी केले. ते दलित नसले तरी दलित, वंचितांबद्दलची भावसाक्षरता व भावजागर घडवून आणण्यास या साहित्याने मोलाची मदत केली.

 मराठी दलित कथा ज्या पार्श्वभूमीवर विकसित झाली, तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा होता. ही चळवळ केवळ राजकीय नव्हती, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने ते मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचेच आंदोलन होते. शाहीर अण्णा भाऊ साठे यात हिरिरीने भाग घेत. त्यातून त्यांची प्रतिभा विकसित झाली. त्यांनी विपुल कथालेखन करून दलित, ग्रामीण, वंचित, स्त्रिया यांच्या चित्र-चरित्रांचा, प्रश्न-समस्यांचा व्यापक पट विस्तारला. ‘बरबाद्या कंजारी', 'चिरागनगरची भुतं', 'निखारा', 'नवती', 'पिसाळलेला माणूस', ‘आबी', ‘फरारी', 'भानागती', 'लाडी', 'कृष्णाकाठच्या कथा', ‘खुळवाडी', 'गजाआड’, ‘गु-हाळ' या तेरा कथासंग्रहांतून वंचित माणसांच्या जगण्याचा संघर्ष चित्रित केला. या लढणाच्या, संघर्ष करणाच्या माणसांच्या कथा असल्याने या रचनांनी दलित साहित्याला मुठी आवळून त्वेष व्यक्त करण्याचं बळ दिलं. या कथांमध्ये नाट्य आहे आणि कलात्मकताही. शंकरराव खरात यांनी ‘बारा बलुतेदार' (१९५९), ‘तडीपार' (१९६१), ‘सांगावा' (१९६२), ‘टिटवीचा फेरा' (१९६३), ‘सुटका' (१९६४), ‘गावशिव' (१९७०) या कथासंग्रहांत भटक्या आणि विमुक्त समाजाबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांतून हाती आलेली कथाबीजे विस्तारली आहेत. बलुतेदार समाजाच्या जगण्यातील जाच त्यांचा कथांचे केंद्रीय सूत्र होय. गुलामी,

मराठी वंचित साहित्य/४३