पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठीत विकसित झाला की त्यांनी वंचित वर्गाच्या सर्व थरांना लिहिण्याची प्रेरणा दिली. जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेशादी भेदांपलीकडे माणसास माणूस म्हणून बघण्याची, स्वीकारण्याची व मान्यता देण्याची परंपरा निर्माण करण्याचा लोकजागर या साहित्याने घडवून आणला. इतकेच नव्हे तर या मराठी साहित्यप्रवाहाकडून प्रेरणा घेऊन हिंदी, बंगाली, कन्नडादी भारतीय भाषांत हा प्रवाह निर्माण झाला. पुढे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय साहित्याचा विचार करताना दलित साहित्याची नोंद घेणे भाग पडले, अनिवार्य झाले.

 नकार, विद्रोह, संघर्षाच्या पायावर उभे असलेले दलित साहित्य हे मूलतः आत्मशोध, आत्मबोधाचे असल्याने त्याचा आत्मस्वर तीव्र असणे ओघाने आलेच. महात्मा फुले यांनी टिळकयुगापूर्वी स्वातंत्र्य, समता व न्यायाच्या विचारांचा पुरस्कार करीत स्त्री, शूद्र, अतिशूद्र यांच्यावर धर्म, रूढी, चालीरीती इत्यादींच्या नावावर होणा-या अन्याय, अत्याचाराचा कठोर शब्दांत आपल्या लेखनातून विरोध केला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या प्रारंभी टिळकयुगाचा अस्त झाल्यानंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीतून जी अनेक लोकजागृतीची कार्ये केली, त्यांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास महत्त्व दिले. आपल्या ‘सत्याग्रह' (१९१९), 'यंग इंडिया' (१९१९), 'नवजीवन' (१९१९), 'हरिजन' (१९३३) या नियतकालिकांतून त्यांनी लोकजागर घडवून आणला. यातून जे अनुकूल लोकमत तयार झाले. ते ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या घोषणेमुळे प्रखर बनले. त्यातून दलितांना स्वातंत्र्यपूर्व काळात राखीव मतदार संघ मिळाले व राजकीय अधिकार आणि प्रतिनिधित्व लाभले. स्वातंत्र्योत्तर काळात घटनेत आरक्षणाची तरतूद करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी दूरदृष्टी दाखविली, त्यामुळे दलित वर्ग समाजाच्या मध्यप्रवाहात येणे शक्य झाले. महात्मा गांधींप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' (१९२०), 'बहिष्कृत भारत' (१९२७), 'जनता' (१९२९), ‘प्रबुद्ध भारत' (१९५५) या नियतकालिकांतून विपुल लेखन करून समाजमन संघटित केले. असेच प्रयत्न त्यापूर्वी किसन फागू बनसोडे यांच्या 'विटाळ विध्वंसक' (१८८८), ‘निराश्रित हिंद नागरिक' (१९१३, ‘मजूर पत्रिका' (१९१८), चोखामेळा' (१९३१) या नियतकालिकांनी बजावली होती. हरिहरराव सोनुले, ना. रा. शेंडे, शंकरराव सुराडकर, चां. भ. खैरमोडे, नामदेवराव व्हटकर, दा. ता. रूपवते, घनश्याम तळवटकर, प्रभृती लेखकांच्या लेखनांनीपण स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागृतीस हातभार लावला होता, हे विसरता येणार नाही. आजचे दलित साहित्यही त्या लोकजागृतीची परिणती म्हणून पाहणे आवश्यक आहे. नंतरच्या काळात शाहिरी, जलसे

मराठी वंचित साहित्य/४२