पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी दलित साहित्य


 मराठी साहित्याच्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘साठोत्तरी साहित्य म्हणून गणल्या गेलेल्या कालखंडात ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य प्रवाहाबरोबर विकसित झालेला साहित्यप्रवाह म्हणून दलित साहित्याकडे पाहिले जाते. या साहित्याने आत्मकथा, काव्य, कथा, कादंबरी अशा साहित्यप्रकारात मोलाची भर घातली. स्त्रीवादी साहित्याप्रमाणे या प्रवाहाने समाजजाणिवांत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणले. या साहित्याचे प्रेरक म्हणून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्याकडे पाहिलं जातं. अस्पृश्यता निवारणाचे त्यांनी जे विचारमंथन व समाजकार्य केले, त्याची फलश्रुती म्हणून दलित वर्गात शिक्षणाचा प्रसार झाला. ती पिढी जेव्हा सन १९६० च्या दरम्यान लिहिती झाली, तेव्हा त्यांच्यात वर्गजाणीव होणे स्वाभाविक होते. आजवरचे मराठी साहित्य हे मध्यम वर्गाकडून लिहिले गेले होते. त्यात दलितांबद्दल सहानुभूती असली तरी जातीय उदारता नव्हती. जातीय जाणिवा तेव्हाच प्रकर्षाने साहित्यात उतरतात जेव्हा बळीच बोलू लागतो. या दृष्टीने दलित साहित्याने साडेतीन टक्क्यांची संस्कृती, भाषा, साहित्य नाकारून स्वत:चा स्वर, व्यथा, वेदना व्यक्त करणारे साहित्य लिहिणे पसंत केले. त्याची सुरुवात 'बलुतं', 'उपरा', ‘उचल्या', 'कोल्हाट्याचं पोर’, ‘आठवणींचे पक्षी'सारख्या आत्मकथनातून झाली. ते पूर्व ललित साहित्याइतकंच कलात्मक, पण समाज परिवर्तनाच्या दृष्टीने महत्त्वाचं असं नवं अनुभवदर्शन असल्याने मराठी वाचकांनी त्याला चांगलीच दाद दिली. त्यातून दलित साहित्य समीक्षा, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र विकसित झाले आणि बहुजन, मध्यमवर्गीय साहित्याच्या समांतर एक असा साहित्यप्रवाह

मराठी वंचित साहित्य/४१