पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती दुष्काळाने. जागतिकीकरणातील उद्ध्वस्त, आत्महत्याग्रस्त शेतक-याचं वैफल्य हे कवी चित्रित करतात.

 मराठी ग्रामीण साहित्याचा प्रवाह व प्रभाव आपणास महात्मा फुले यांच्यापासून ते आजपावेतो पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, स्वातंत्र्यानंतर झपाट्याने खेड्यांचे नागरीकरण होते आहे. ते शिक्षण दळणवळणाची साधने, संपर्क माध्यमे, शहरीकरणाची ओढ ही त्याची स्थूल कारणे असली तरी शेती किफायतशीर न राहणे, सहकार चळवळीचे भ्रष्टाचाराने क्षीण होणे, वाढत्या शिक्षणाने ग्रामीण मनुष्यबळाची शेतीशी होत जाणारी फारकत, स्त्रीशिक्षण प्रसार, वाढती बेरोजगारी इत्यादींने ग्रामीण प्रश्न बदलत आहेत. त्याचे काहीएक चित्रण ग्रामीण कथा, कादंबरी, काव्यातून सतत होत राहिले आहे. वर्तमान ग्रामीण साहित्यापुढील खरा प्रश्न उदार आर्थिक धोरणाने रोज होत जाणारा उद्योगविस्तार, खेड्याच्या समूहसंस्कृतीची जागा व्यक्तीसंस्कृतीने घेणे, घरोघरी वाढत जाणारी नोकरी करणा-यांची संख्या, शिक्षणमानात सततची वाढ व खेड्यातील जीविका साधनसंकोच (रोजगार) त्यामुळे जी गुंतागुंतीची परिस्थिती, घुसमट निर्माण झाली आहे, तिचे साहित्यात प्रतिबिंबन होऊन ग्रामजीवनाची फेरमांडणी, नियोजन व शेतीचं अतूट राहणे ही आव्हाने ग्रामीण मराठी साहित्य कसे पेलणार, चित्रित करणार, पर्याय देणार हा प्रश्न आहे. प्रश्न साहित्यदर्जाचा नसून नव्या प्रश्नांची आव्हाने पेलण्याचा आहे. आणखी एक गोष्ट ग्रामीण जीवनात महत्त्वाची आहे ती ही की, नवी शिक्षित स्त्री व युवक खेड्यात राहणे पसंत करीत नाहीत. जोवर खेड्यात रोजगार संधीचा विकास, विस्तार होणार नाही, तोवर खेडी उद्ध्वस्त होण्याचा क्रम थांबणे अशक्य. ग्रामीण साहित्यात दिसणारे मार्दव, मातीतून आलेले संस्कृतीचे वात्सल्य जागतिकीकरणाच्या गतीत हरवते आहे. खेड्यात दिसणारी भौतिक समृद्धी काँक्रीटच्या घरांवरून कोणी मोजेल तर फसगत आहे. जनावरांची जागा यंत्रे घेती होणे व माणसाचे यंत्र होणे अशा दुहेरी कात्रीत ग्रामसंस्कृतीची कत्तल सुरू आहे. ती थोपविणे व नव्या ग्रामसंस्कृतीची मांडणी व चित्रण यावरच उद्याच्या मराठी ग्रामीण साहित्याचा चेहरा, मोहरा, होरा ठरणार आहे, हे मात्र निश्चित. राजन गवस, इंद्रजित भालेराव, कृष्णात खोत, सदानंद देशमुख असे सारे मोहरे आपली गढी व गुढी शहरात उभारतात. परकाया प्रवेश केव्हा तरी कृत्रिम ठरणारच ना?

मराठी वंचित साहित्य/४०