पान:मराठी वंचित साहित्य (Marathi vanchit sahitya).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यातून गेल्या पन्नास वर्षांतला बदलता महाराष्ट्र प्रतिबिंबित होतो. स्वतंत्र महाराष्ट्राचं बिलोरी स्वप्न भंग झालेलं दाखविणा-या या कादंब-या नवविकासाचा रोडमॅप सूचित करतात.
 कथा, कादंबरीप्रमाणे ग्रामीण काव्याची परंपराही मराठी साहित्यात प्राचीन काळापासून आढळते. इंग्रजी Pastoral Poetry च्या समांतर मराठीत गोपगीते, कृषी संस्कृतीची गाणी, लोकगीते, अभंग, ओव्यांतून मराठी ग्रामीण कविता पाझरताना दिसते. ती परंपरा मौखिकही आहे आणि लिखितही. लिखित ग्रामीण कवितेची आद्यरूपे संतकवींच्या काव्यातून दिसून येतात. निवृत्तिनाथांचे शोकविव्हल आयुष्य चित्रित करणारा ‘बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट'सारख्या पदातून हे स्पष्ट होतं. ज्ञानेश्वरी तर 'देशीकार लेणे'च. जनाबाईंच्या काव्यातही भाषिक देशीयता दिसते; पण ख-या अर्थाने आधुनिक काळात जिला ग्रामीण मराठी कविता म्हणून संबोधले जाते, ती कविता मात्र विसाव्या शतकातील. ‘शेतकरी व भाताचे पीक', 'पेरील औं शेतकरी न काहीं' सारख्या विसाव्या शतकातील प्रारंभीच्या कविता त्यांचे कवी अज्ञात असले तरी महत्त्वाच्या होत. कवी मायदेवांची ‘इरलेवाली', भा. रा. तांबेंची ‘गुराख्याचे गाणे', गोपीनाथांचा ‘रायबा' अशा कवितांनी ग्रामीण जीवन व संस्कृती मराठी काव्यात रूढ केली.

 कवी गिरीशांचा ‘आंबराई', यशवंतांचा ‘पाणपोई', ग. ह. पाटीला यांचा ‘रानजाई', ग. ल. ठोकळ यांचा ‘सुगी' अशा काव्यसंग्रहातील ग्रामीण कवितांची कृषिजन काव्य मराठीत रूढ केलं. बहिणाबाईंची गाणी म्हणजे ग्रामबोलीचा फुललेला मळा. अहिराणी बोली त्यांनी रूढ केली. बालकवींनी निसर्गाचा लळा मराठी वाचकास लावला. त्यांची ‘फुलराणी', 'श्रावणमास' कविता पाठ नाही असा मराठी माणूस विरळा; पण ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई' खरं ग्रामीण चित्र उभी करते. नंतरच्या काळात ना. धों. महानोर, विठ्ठल वाघांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना. धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी', 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध येतो. विठ्ठल वाघ यांच्यानंतर मराठवाडा, खानदेशचे लोकजीवन इंद्रजित भालेराव, प्रकाश होळकर, सदानंद देशमुखांसारख्या कवींनी चित्रित केलं. इंद्रजित भालेराव समकालाचे दमदार ग्रामीण व कृषिवल संस्कृतीचे गायक कवी. शेतकरी संघटनेतून उदयाला आलेल्या या कवींनी ‘पीकपाणी', 'काबाडाचे धनी', 'पेरा’, ‘टाहो'मधून ग्रामसंवेदना, कलात्मकरीत्या सादर केली. प्रकाश होळकरही त्याच पठडीतील. पण सदानंद देशमुखांच्या कवितेचा बाज न्यारा. त्याला दु:खाची झालर येते

मराठी वंचित साहित्य/३९