पान:मराठी रंगभुमी.djvu/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनन करणे अवश्य आहे; व नाट्यकलाभिलाषी लोकांसही या पुस्तकानें मराठी रंगभूमीच्या इतिहासाची हवी तितकी भरपूर माहिती मिळून नाट्यकलेसंबंधी चांगल्यावाईटाची निवड करण्यास या पुस्तकाची उत्तम मदत होईल, असा आह्मास भरंवसा आहे. रा. कुलकर्णी यांनी मराठी ग्रंथसंग्रहास एका नव्या दिशेनें भर घातली आहे, यासाठी त्यांचे अभिनंदन करणे वाजवी आहे.


रा. रा. न. चिं. केळकर बी. ए. एलएल्. बी.
मराठाकर्ते यांचा अभिप्राय.

 'मराठी रंगभूमि' हे पुस्तक मी समग्र वाचून पाहिले. यांतील पहिला व तिसरा हे भाग मला विशेष मनोरंजक वाटले. पहिल्या भागांत मराठी भाषेच्या उदयानंतर नाटकाच्या संस्थेचा मूळ पाया कसा रचला गेला व हरिदास, गोंधळी, शाहीर व लळितकार वगैरे लोकांच्या आंगच्या गुणांतील कांहीं कांहीं गुण एकवटून प्रथम पौराणिक नंतर बुकिश व नंतर संगीत अशा रीतीने तिला हल्लीचे स्वरूप कसें प्राप्त झाले हे दाखविलेले आहे. परंतु त्यांतल्या त्यांत पौराणिक नाटकें ही अलीकडल्या पिढीस लुप्त झाल्यामुळे त्यांचेसंबंधाची माहिती वाचकांस बरीच आवडेल यांत शंका नाही. कोणतीही परंपरा एकदां रूढ झाली ह्मणजे तिजविषयीं अपूर्वाई किंवा कौतुक वाटेनासे होते. तथापि, त्या परंपरेस मूळ सुरवात करणाराची बुद्धि असामान्य असलेली आढळून येते; व या दृष्टीने पाहतां महाराष्ट्रांतील आद्य सूत्रधार विष्णुदास यांचे स्वतंत्र चरित्रच लिहिण्यासारखे असले पाहिजे असें हल्लीच्या पुस्तकांत दिलेल्या माहितीवरून व मला माहीत असलेल्या इतर हकीकतीवरून वाटते. तिसऱ्या भागांत नाटकासंबंधाच्या कित्येक आनुषंगिक व किरकोळ मुद्यांचा विचार केला आहे तोही माझ्या मतें बरा आहे. यांतील कित्येक मुद्यांवर मतभेद होणे शक्य आहे; तथापि, एकंदरीने पाहतां नाटकाच्या भावी सुधारणेची जी दिशा त्यांत दाखविली आहे ती बहुजनसमाजास मान्य होईल असें ह्मणण्यास हरकत नाही. नाट्यकला सुधारण्याची