पान:मराठी रंगभुमी.djvu/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खरी जबाबदारी कोणाकडे आहे, व नाटकमंडळ्यांस साहाय करण्याचे दृष्टीने आमच्यांतील विद्वान् लोकांनी काय काय करणे जरूर आहे या मुद्यांवर या पुस्तकांत लिहिले आहे त्यापेक्षा आणखी बरेंच लिहितां येईल; परंतु त्यांतील मुख्य मुद्दा सांगावयाचा ह्मटला ह्मणजे असा की, सामाजिक करमणुकीचे उत्तम साधन या नात्याने नाटकाच्या संस्थेचा अविद्वानाप्रमाणे विद्वान् लोकही फायदा घेत असतां तिच्यासंबंधाने बोलण्याचा किंवा तिचा उघड रीतीने अंगिकार करण्याचा प्रसंग आला असतां ते नाके मुरडून एक प्रकारे तिची निंदा करून कृतघ्न बनतात. नाटक ही संस्था सर्वांशी आदरणीय होण्यास नाटकप्रयोग व विशेषतः नाटकमंडळीची सामाजिक वर्तणूक यांजमध्ये बरीच सुधारणा झाली पाहिजे हे उघड आहे. परंतु या बाबतींत विद्वान् व मार्मिक लोकांची सल्ला व उपदेश घेऊन त्याचा अंमल करणे हे जसें नाटकमंडळ्यांचे कर्तव्य आहे तसेंच ती सल्ला व तो उपदेश देणे व नाटकमंडळ्यांविषयीं तिरस्कार न दाखवितां एक प्रकारे सहानुभूति दाखवून त्यांना खालच्या पायरीपासून वरच्या पायरीकडे नेणें हें विद्वान् लोकांचे कर्तव्य आहे.