पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७

वर्ण पुनः पुनः आले असतां, त्यांच्या ध्वनींत-साम्य उत्पन्न होऊन, तें कानास फार गोड लागतें, व त्यापासून मनास मोठा चमत्कार वाटतो तो. जसें--

 "अशीं कामें, अशा लटपटीच्या खटपटीनें घाटास येऊन शेवटास जातील असें वाटत नाहीं. प्रयन मात्र निष्फल होऊन कार्य सफल होणार नाहीं.” इत्यादि.

 ह्या वर्गांत अनुप्रास, यमक, इत्यादि अलंकारांचा समावेश होतो.

अनुप्रास.

 जेथें एक किंवा अनेक व्यंजनांची आवृत्ति येते, म्हणजे तें किंवा तींच व्यंजनें वारंवार येतात, तेथें हा अलंकार होतो. मग तीं व्यंजनें भिन्नस्वरयुक्त असलीं तरी चिंता नाहीं. जसें मंजुघोषेंत एके ठिकाणीं म्हटले आहे कीं--

 १. "(मी) परत जातेसमयीं तुझे गळ्यांतील हार खुंटीस लटकावून सुरईंतील गार पाण्याची धार तुझे अंगावर फेंकून फार त्वरा करून पार निघून परत गेलों."

 २. “हे तनया, वसंतमाधवराया, तुझे हे पाय अंतरल्यानें ही तुझी माय दीन गाय होऊन हाय हाय करीत बसेल असें मात्र करूं नको."

 ह्याच्या योगानें रचना कठोर किंवा मृदु करितां येते. गद्यांत जेथें मनोवृत्तीच्या अवस्था वर्णिल्या असतात, तेथें ती ती मनोवृत्ति मृदु किंवा कठोर वर्णांची योजना करण्यांत ह्याही अलंकाराची मृदु किंवा कठोर वर्णाच्या आवृत्तीनें योजना केली तर तेथें हा विशेष शोभतो. जसें--