पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



येणार नाहींत; ते तिच्या सौंदर्यशास्त्राच्याच द्वारें आणतां येतात; ह्यणून भाषेस व्याकरणाची जितकी आवश्यकता तितकीच, किंबहुना त्याहूनही तिचे सौंदर्यशास्त्राची अधिक आहे, हें कोणीही विचारी मनुष्य कबूल करील.
 ह्या पुस्तकांत भाषेच्या अंगीं शोभा आणण्याचेच नियमांचा विचार केला असल्यानें ह्याचें नांव भाषासौंदर्यशास्त्र असें ठेविलें आहे.
 ह्या पुस्तकाचे, शब्दयोजना, वाक्यरचना, अर्थसाधन, रसविचार, अलंकारविचार आणि भाषासरणि असे सहा विभाग करून त्यांचें संक्षेपानें विवेचन केलें आहे.
 भाषालेखनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक गद्यरचना आणि दुसरी पद्यरचना. गण, मात्रा इत्यादिकांचा नियम नसून सरळ वाक्यांची जी रचना तीस गद्य म्हणतात. आणि ज्या रचनेंत इतकीं अक्षरें लघु व इतकीं गुरु आलीं पाहिजेत असे नियम असतात तीस पद्य म्हणतात. कांहीं ग्रंथ गद्यरचना आणि पद्यरचना ह्या दोहोंनीं मिश्र असतात.
 मराठी भाषेस संस्कृत भाषेंतीलच नियम लागू करण्याचा परिपाठ पडल्यामुळें व पद्यरचनेंत ज्या विषयांत भाषेस सौंदर्य आणण्याची आवश्यकता आहे अशा विषयांविषयीं त्यांत पुष्कळ विचार केला आहे तो गद्यासही लागू आहे, तथापि गद्यरचनेंत म्हणजे निबंध, संवाद, स्फुट लेख वगैरे ह्यांमध्यें जेव्हां भाषेस सौंदर्य आणण्याची आवश्यकता असते तेव्हां त्यांस लागू पडण्यासारख्या ज्या गोष्टी असतील त्याच ह्या लहानशा पुस्तकांत दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
 या सर्व गोष्टींवरून आपल्या मनांतील विचार दुसऱ्यास कळविण्याचें मुख्य साधन जी भाषा ती मनोरम होण्यास तर