पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या शास्त्रावांचून दुसरें साधनच नाहीं. आपणास आपलें महाराष्ट्रीयत्व कायम ठेवणें आहे, तर आपण मराठी भाषा कायम ठेविली पाहिजे. इतर भाषांप्रमाणें हिच्यांत तूर्त सामर्थ्य नसलें तर तो दोष हिचा नसून आपला आहे. मराठी भाषा आपली आहे व हिचा प्रसारही आपणच केला पाहिजे. आपली भाषा चांगली असावी अशी इच्छा सर्वांस असतेच म्हणून आपल्या मातृभाषेची यथाशक्ति सेवा घडावी व अशा उपयुक्त शास्त्राची मराठी भाषेंत अद्याप व्हावी तशी प्रवृत्ति झाली नाहीं तरी ह्याच्या सामान्य नियमांची माहिती आपल्या देशबांधवांस व भगिनींस होऊन इकडे त्यांची प्रवृत्ति व्हावी इतकाच ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. तो सफल होऊन प्रयत्न निष्फल होणार नाहीं अशी आशा आहे.
 ह्या पुस्तकांत नजरचुकीनें आणि अज्ञानानें दोषस्थळें राहिलीं असतीलच. विद्वान्, रसिक व गुणग्राही जन अशा सर्व दोषांचें थोर व उदार बुद्धीनें संशोधन करून गुणलेश दिसला तर त्याचा आदर करतील अशी आशा आहे.
 हें पुस्तक जाहिरातीप्रमाणें मागेंच छापून तयार व्हावयाचें, परंतु संसारांत मनुष्याच्या सुखाचीं मुख्य साधनें जीं कनक व कांता ह्या दोहोंलाही ईश्वरी अवकृपेनें मी अंतरल्यानें, मनाच्या अस्वस्थतेमुळे मुदतींत तयार झालें नाहीं. तरी वे. शा. सं- रा. रा. हरि दत्तात्रय ऊर्फ आपाशास्त्री ओगले यांनीं आपला अमोलिक वेळ खर्चून प्रुफें तपासण्याचे कामांत साहाय्य करून माझा हेतु सिद्धीस नेला; याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहें. हें पुस्तक तयार झाल्यावर निर्णयसागर छापखान्यातील शास्त्री वे. शा. सं. रा. रा. भालचंद्र शंकर देवस्थळी यांस दाखविलें; त्यांनीं आपली संमति प्रदर्शित करतांना अर्पण-