पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४

ती स्वकांत ह्या आलंबन विभावानें उद्भूत होऊन, शरत्काल, चंद्रिका, मलयानिल ह्या उद्दीपनविभावानों अधिक वाढली. स्मृति, दैन्य, शंका, वितर्क इत्यादि अप्रधान मनोवृत्तींनीं ( संचारीभावांनीं) परिपुष्ट होऊन, पायां पडणें, पदर पसरणें व गायन करणें, इत्यादि कार्यांनीं (अनुभावांनीं) स्पष्ट प्रकट झाली आहे.

 ह्या दोन्ही उदाहरणांत प्रेम नामक मनोवृत्ति, आश्रयीभूत नायिकानायक ह्या आलंबन आणि चंद्रोदयादि उद्दीपक विभावांनीं उद्भूत व उत्तेजित होऊन व्यभिचारीभाव संज्ञक अप्रधान इतर मनोवृत्तींनीं पुष्ट होत्साती, आलिंगनादि क्रियारूप अनुभाव संज्ञक कार्यांनीं स्पष्ट प्रकट झाल्यानें रस ह्या संज्ञेस पावली आहे. यावरून एक गोष्ट चांगली ध्यानांत ठेविली पाहिजे कीं, प्रधान मनोवृत्ति ह्मणजे स्थायीभाव हे जर त्यांच्या त्यांच्या कारण, कार्य, व सहकारी ह्मणजे विभावानुभाव आणि संचारीभाव यांहीं पूर्ण विकसित न झाले तर त्या मनोवृत्तीस रस ही संज्ञा प्राप्त होत नाहीं; जसें--

दिंडी.
विभूतीनें झांकला अनलसा तो
गुप्तदमयंतीविरह नृपा होती

 ह्यांत, दमयंतीविषयक नलाच्या मनांत उत्पन्न झालेली प्रेम नामक मनोवृत्ति प्रकट झाली नसल्यानें, श्रृंगार रस झाला नाहीं.