पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६

 १ कधीं आलंबनाचे गुण, २ कधीं त्याच्या चेष्टा, ३ कधीं त्याचे अलंकार, आणि ४ कधीं तटस्थ देश, काल इत्यादिक.

 ह्या चार प्रकारच्या उद्दीपक कारणांनीं मनोविकार वाढतो; ह्मणून आलंबनाचे गुण, चेष्टा, अलंकार आणि तटस्थ असे, उद्दीपनविभावांत चार भेद मानिले आहेत.

अनुभाव.

 मनोवृत्ति उत्पन्न झाल्यानंतर, मनुष्याच्या शरीरावर जें तिचें कार्य घडतें, ह्मणजे अश्रु, रोमांच, रंग पालटणें, आवाज बदलणें, इत्यादि जीं चिन्हें दिसतात तीं, व तो कांहीं क्रिया करितो त्या, हे सर्व अनुभाव होत.

 ज्या अर्थी हीं मनोविकाराचीं कार्य आहेत, त्या अर्थी, हे त्यामागून उत्पन्न होतात हें साहजिकच आहे; व ते दुसऱ्याच्या अनुभवासही येतात; ह्मणजे हे शरीरावर दृष्टीस पडतात; याकरितां हे शरीरविकार मानण्यास हरकत नाहीं. त्याचे (१) कायिक, (२) मानसिक, (३) आहार्य, आणि (४) सात्विक असे चार भेद आहेत.

 ( १ ) कायिक-मनोविकारामुळें तोंडावर दिसणारीं निरनिराळ्या मनोविकारास योग्य अशीं चिन्हें, व शरीराचे चलनवलनादि व्यापार ते.


१ ये रसाननुभावयंति अनुभवगोचरतां नयन्ति ते अ० कटाक्षदय: |