पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४

 भाव-रसास अनुकूल असलेला जो विकार त्यास भाव ह्मणतात. हा दोन प्रकारचा आहे.

 १ मानसिक, व २ शारीरिक.

 (१) मानसिक-ज्यांत स्थायीव्यभिचारी हे भव असतात तो.

 (२)शारीरिक-ज्यांत सात्विक भाव असतात तो.

 ह्यावरूनच भाव (मनोविकार) स्थायी व व्यभिचारी, असे दोन प्रकारचे झाले आहेत.

* स्थायीभाव.

 जी मनोवृत्ति एकदां उत्पन्न झाली असतां, इतर मनोवृत्तींनीं समूल चित्तांतून जात नाहीं व जी वृद्धिंगत झाली असतां रसरूप होते, त्या प्रधान मनोवृत्तीस स्थायीभाव ह्मणतात. ह्या १ तरुण स्त्रीपुरुषांची प्रीति, २ उत्साह, ३ शोक, ४ क्रोध, ५ हास, ६ भय, ७ चिळस, ८ विस्मय, आणि ९ वैराग्य अशा नऊच आहेत; ह्याच त्यांच्या त्यांच्या कार्यकारणांनीं ह्मणजे अनुभावविभावादिकांनीं वृद्धिंगत झाल्या असतां त्यांस अनुकर्म १ श्रृंगार, २ वीर, ३ करुणा, ४ रौद्र, ५ हास्य, ६ भयानक, ७ बीभत्स, ८ अद्भुत आणि ९ शांत अशा संज्ञा प्राप्त होतात. ह्यांसच नवरस ह्मणतात.


 * स्थायीभाव:–रतिर्हासश्च शोकश्च क्रोधोत्साहो भयं तथा| जुगुप्सा विस्मयश्चैव स्थायीभावाश्च कीर्तिताः ||