पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

  ह्यांत 'होतें' हें क्रियापद अनेक वेळां आलें आहे, तें अधिक आहे. हेंच वाक्य "त्याच्या भाषणांत मार्दव, पदलालित्य, अर्थगौरव आणि चातुर्य होते.” असें लिहिलें तर अधिक शब्द गाळले जातात.
 ३. व्याकीर्ण--ज्या वाक्यांत पदें दूरान्वितान्वित असतात तेथें हा दोष होती. जसें--‘रयतेनें दु:खें राजाच्या आपलीं कानावर लहान मोठीं असतील तीं घातल्याविना कळण्याला त्यांस तीं दुसरें साधन नाहीं. तेव्हां त्याजकडून निवारण न झालें तर त्यांचें त्यांत दोष त्याचा काय ?"
 ह्या वाक्यांतील पदें दूरान्वित असल्यामुळें वाक्याचा अन्वय बरोबर लक्षांत येत नाहीं, व वाक्यही कानास गोड लागत नाहीं. हें वाक्य असें पाहिजे:--
 "रयतेनें आपलीं लहान मोठीं दु:खें, जीं असतील तीं, राजाच्या कानावर घातल्याविना, त्यास तीं कळण्यास दुसरें साधन नाहीं. तेव्हां त्यांचें निवारण त्याजकडून न झालें, तर त्यांत त्याचा काय दोष ?”
 ४. समाप्तपुनरातत्त्व--कर्ता, कर्म आणि क्रियापद, यांचा अन्वय लागून वाक्यार्थ संपूर्ण झाल्यावर त्याच वाक्यांत अन्वित असलेला कांहीं अंश पुढें आला असतां हा दोष होतो. जसें--
 १. "मोरोपंताच्या कवितेचें पदलालित्य, माधुर्य, शब्दसौष्ठव अवर्णनीय असतें. तसेंच सरसत्वही.'