पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

  २. "ह्या जगाचा उत्पन्नकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता परमेश्वर आमचें कल्याण करो. भक्तांचा कैवारीही.”
 ह्यांतील पहिल्या वाक्यांत 'तसेंच सरसत्वही.” व दुस-यांत 'भक्तांचा कैवारीही.” हे वाक्यांश वाक्यार्थ पूर्ण झाल्यावर नंतर मागून घ्यावे लागतात.
 ५.भग्नक्रम--ज्या क्रमानें उपक्रम केला त्याच क्रमानें उपसंहारही केला पाहिजे असा नियम आहे. त्याविरुद्ध जेथें क्रमाचा विपर्यास होतो तेथें हा दोष होतो. जसें--
 १. ‘सेनापतीनेंच जेव्हां शस्त्रें टाकिलीं, तेव्हां मागून सैनिकांनींही सोडिलीं.” येथें 'सोडिलीं' या ठिकाणीं ‘टाकिलीं' असें पाहिजे. कारण उपक्रमांत टाकिलीं ही क्रिया आली आहे. आणखी जसें--
 २. "द्रव्य संपादण्याकरितां, कीर्ति मिळविण्याकरितां, सुखप्राप्तीकरितां, व धर्मरक्षणास्तव मनुष्य पाहिजे ते उपाय करण्यास चुकत नाहीं.”
 ह्मांत ‘धर्मरक्षण करण्याकरितां' असे शब्द पाहिजेत, कारण मागें उपक्रमांत ‘करितां' हेंच पद आलें आहे.
 ३."युद्ध निवृत्त झाल्यानंतर, ते, रथ, हत्ती, घोडे, गाड्या, त्यास स्वार, माहुत, सारथी व गाडीवान येऊन घेऊन गेले."
 ह्यांत रथादिकांच्या क्रमानें सारथी, माहुत, स्वार व गाड़ीवान असें पाहिजे.
 भाo २