पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखी शिक्षक म्हणजे अभय निरुपद्रवी आणि सज्जन, स्त्री दाक्षिण्य असलेला. हे असते शिक्षकाचे बलस्थान. नैतिक सचोटी, परस्त्री मातेसमान मानणारा, अनुकरणीय शिक्षक व्हायचे तर तुमचा आत्मस्वर नैतिक हवा. भौतिक संपन्नतेच्या मागे लागून आपला 'कांचनमृग' होणार नाही, 'मिडास' होणार नाही, हे ही आपण पाहायला हवं. हे असतं शिक्षकाचं विधवा होणं, आणि सतीचं वाण.
 समाजाचं सर्वाधिक लक्ष जर कुणाकडे असेल तर ते शिक्षकांकडे असते. मला कोल्हापूरच्या सिटी बसमध्ये कितीही गर्दी असली तरी उभे राहावे लागत नाही. भरल्या बसमध्ये चढल्यावर पण कोणीतरी उठून मला बसा म्हणतो. ती अथवा तो माझा विद्यार्थी, विद्यार्थिनी असते, पालक असतो अन् एखादा त्रयस्थही असतो. कारण त्यांच्या लेखी, मनी मी शिक्षक असतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुम्ही शिक्षक असले पाहिजे. शिक्षक 'व्रत' आहे की 'व्यवसाय'? तर मी म्हणेन ते व्रतच असायला हवे. व्रत म्हणजे निश्चय, दृढ प्रतिज्ञता. पानी से पतला कौन है? या हुमानाचे उत्तर 'शिक्षक' आहे. शिक्षक पाट्या टाकायचा उद्योग नाही. माझे शिक्षक मला सांगायचे, 'भले पाटी टाक, पण प्रत्येक वेळी भरून टाक.' शिक्षकाची प्रत्येक कृती महत्त्वाची. कारण ती उपजत अनुकरणीय असते. तुमच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण विद्यार्थी करत असतात आणि तेही अंधभक्तीने. तुम्ही एक अनुस्वार चुकीचा लिहिला तर किमान पन्नास शब्द चुकीचे लिहिले जातात. म्हणून शिक्षकाचे आचार, विचार निर्दोष हवेत. त्याला क्षमा नाही. शिक्षक अक्षम्य व्यवसाय आहे, हे आपणास कधीही विसरून चालणार नाही.
 आज मी निवृत्तीच्या वयात आहे. कधी कधी निराशा येते, मन विषण्ण होऊन राहते. वाटतं आपण जे मूल्याधिष्ठित जीवन जगलो, जो आदर्शवाद जपला, समाजाला त्याचे काही देणे-घेणे नाही. पण आज या नवऊर्जा शिबिरात तुम्ही १००-१५० जण आलात. मलाच नवी ऊर्जा मिळाली. नाही सर्वत्र वाळवंट नाहीत, ओऍसिसही आहेत. डॉ.जे.पी.नाईक यांनी सन १९८० साली बोलावले तेव्हा ५० शिक्षक होते. आज २०१५ साली १५० आहेत. त्या वेळी सर्व शिक्षकच होते. आज कितीतरी शिक्षिका या शिबिरात आहेत. आड वाटेला शिबिर भरलं असताना त्या आल्यात, हे पाहून मी सुखावलो आहे, भरून पावलो आहे. माझ्या दृष्टीनी एकविसाव्या शतकातले हे आशादायी चित्र आहे, स्वप्न आहे. शासकीय आदेश नसताना तुमचं येणं ही क्रांती आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०५