पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'एक-एक से ही कारवाँ बनता है।' मी लहान असताना आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायचे. गोष्ट कौरव-पांडवांची असायची. १०० कौरव विरुद्ध ५ पांडव. ते एकमेकांविरुद्ध असूनही त्यांच्यावर कुणी तिऱ्हाइतांनी हल्ला केला तर ते मिळून १०५ होऊन लढायचे. आज आपण १०५ एक आहोत. आपल्यात कौरव आहेत नि पांडवही. पण आदर्श व्हायचे आपण सर्वांनी मिळून. वर्तमान शिक्षकांच्या प्रचंड संख्येत आपण पांडवांप्रमाणे अल्पसंख्य असू. पण महाभारत घडविण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. आपला आत्मस्वर जागा आहे नि नवऊर्जा घेण्यास आपण उत्सुक आहोत. आपण देश बदलू शकू. समाजाचा मोहरा बदलण्याचे सामर्थ्य आपणात आहे.
 सन १९७० साली मी याच तालुक्याच्या (भुदरगड) सीमेवरच्या पिंपळगाव नावच्या गावी शिक्षक होतो. गावचे छोटे पोस्ट होते. पोस्टातला पोस्टमन रोज सारं टपाल घेऊन शाळेत यायचा. तो शिकलेला होता पण त्याला इंग्रजी येत नसायचं. आम्ही सारं टपाल त्याला वर्गवारी (सॉर्टींग) करून देत असू. तो फक्त पोहोचवायचं काम करायचा. आम्ही सारं टपाल वाचायचो. संध्याकाळी गावचे सर्वजण टपाल वाचून घ्यायला परत शाळेतच येत असत. बहुधा टपाल मुंबईचं असायचं. गावचे लोक मुंबईत कामाला असायचे. आम्ही टपाल न वाचताच संबंधितांना मजकूर सांगायचो. कारण सकाळीच ते वाचलेले असायचे. त्यांना आश्चर्य वाटायचे. यांना न वाचता कसे समजले? अडाणी जगातला शिक्षक त्या वेळी सज्ञानी समजला जायचा नि असायचा पण. आज जग सज्ञानी झाले आहे. शिक्षकांनी अत्याधुनिक नको का असायला? शिक्षकाचे अत्याधुनिक असणे म्हणजे काळाच्या पुढे असणे होय.
 काल मी या वेळेस राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो. मी तिथे काय पाहिले? अधिकांश विद्यार्थी कृषी पदवीधर. ते पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून शासकीय सेवेत अधिकारी होतात. मुळात कृषी शिक्षण हे कृषी विकासासाठी सुरू झाले. ते शिक्षण घेऊन विद्यार्थी शेतीशी संलग्न राहणार नसतील तर त्यांनी कृषी शिक्षण घ्यायचेच का, हा मला पडलेला प्रश्न. शिवाय ती सर्व शेतकऱ्यांची मुले, मुली होती. ते शेतीचं काही करणार म्हणून शासन, समाजानी त्यांना मोफत शिकवलेलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कृषी संस्कृतीचं उद्ध्वस्तपण भरलेलं आहे. डॉक्टरकी शिकलेल्यानं डॉक्टर व्हायचं नाही, शिक्षकी शिकलेल्यानं शिक्षक व्हायचं नाही तर त्या विशेष शिक्षणाला अर्थ उरत नाही. आज

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०६