पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणग्या देऊन पदवीधर झालेला शिक्षक पंडित चंद्रधर कसा राहणार ? हे कमी की काय म्हणून कायम विना अनुदानित संस्थातील 'कायम' शब्द काढून शासनाने आपल्या सग्यासोयऱ्यांच्या या शिक्षण संस्थांना हळूहळू अनुदानाच्या जहागिऱ्या वाटायला सुरुवात केली. हंगामी शिक्षक वर्षानुवर्षे बिनपगारी नोकरी करत राहिले. अनुदानित संस्था होताच फरकाची रक्कम एकरकमी कपातीने संस्था चालकांच्या घशात गेली. संस्था चालकांना पैशाची चटक लागली. त्याचे देणगी फरकातुन समाधान होईना. पैशाची तहान भागवण्यासाठी त्यांनी नियुक्तीसाठी लाखात पैसे घेण्याचा सपाटा लावला. आज शिपायासाठी तीन लाख, प्राथमिक शिक्षकांसाठी पाच लाख, माध्यमिक शिक्षकासाठी दहा लाख, प्राध्यापकासाठी पंधरा लाख, प्राचार्यासाठी पंचवीस लाख सर्रास घेतले जातात.
 हे चित्र एकीकडे तर दुसरीकडे शासनाने पैसे वाचविण्यासाठी विना अनुदान संस्कृती अधिक बळकट करण्याच्या इराद्याने शिक्षण सेवक पद भरतीचा नवा फंडा काढला. तिकडे अशाच शेखचिल्ली कल्पनेतून महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षक (सी.एच.बी.) नेमायचा सपाटा लावला, शून्याधारित अर्थसंकल्प (झिरो बजेट)च्या कल्पनेतून खुल्या वर्गाची पदे न भरण्याचे धोरण स्वीकारून होते नव्हते तितके शिक्षण कसे होणार नाही हेच पाहिले गेले. प्राथमिक स्तरावर जिल्हा परिषदांच्या शाळात तर सध्या शासनाने सचिवांच्या बौद्धिक संपदेतून एक नवी कॅटॅगरी अपंगासाठीच्या शिक्षकांसाठी शोधून काढली. ती म्हणजे फिरता शिक्षक (मोबाईल टीचर). आणिबाणीत आरोग्यमंत्री असलेल्या राजनारायण नामक विदूषकी मुंग्यांच्या सुपीक डोक्यातून अनवाणी डॉक्टर (बेअर फूट डॉक्टर) नेमले गेले होते. तसाच हा अमानुष प्रकार. आजवर शासकीय नोकरीत दोनच प्रवर्ग होते. हंगामी व कायम (टेंपररी/पर्मनंट) हे जे विशेष शिक्षक प्राथमिक शाळात अपंग, अंध, मतिमंदांसाठी नेमले गेले त्यांची एक नवीच कॅटॅगिरी आहे, ती म्हणजे 'कायम हंगामी' (परमनंट टेंपररी). सांगा, तो शिक्षक कोणत्या ऊर्जा, अंत:प्रेरणा घेऊन शिकवणार ?
 हा दुष्काळ एकीकडे तर दुसरीकडे त्याच शाळा, कॉलेजीसमध्ये नियमित पदांवर नेमल्या गेलेल्या शिक्षक, प्राध्यापकांना इतका पगार, इतक्या सोयी, सवलती, सुरक्षा की त्यांनाही संघटनेचे कवच, सेवा सुरक्षा, अतिरिक्त समृद्धीमुळे शिकवावेसेच वाटेना झालेय, असे एक विचित्र चित्र, चरित्र शिक्षिकांचे तयार झाले आहे !
 या सर्व प्रतिकूल वातावरणाने समाजातील शिक्षकांची प्रतिमा डागळत

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९९