पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुरुजींसह त्या सर्वांना आपल्या घरी घेऊन जातो. आदरातिथ्य करतो. त्याला गुरुजींसह पाहुण्यांना काय ठेवू, काय करू नको असे होते.
 स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आज घडली तर कृपाशंकर गुरुजींना कोणी घरी घेऊन जाईल का? त्यांचे आतिथ्य करेल का? याबद्दल मी साशंक आहे. शिक्षकाचे झालेले अध:पतन, प्रतिमाभंजन यास स्वतः शिक्षक किती जबाबदार? शासनाची यात काय भूमिका ? समाजाचा बदललेला चेहरा, व्यापारी वृत्ती, आत्मरतता याला जबाबदार नाही का? या सर्व गोष्टींचा विचार शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे.
 महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर शिक्षकांच्या अध:पतनास सुरुवात झाली ती सन १९८० नंतर. स्वतंत्र महाराष्ट्रात त्या वेळी स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पालकांची मुले उच्च शिक्षण घेती झाली होती. स्वातंत्र्यामुळे समाजाच्या शिक्षण विषयक आकांक्षा उंचावल्या होत्या. डॉक्टर, इंजीनिअर व्हायचं स्वप्ने सर्रास पाहिले जायचे. त्याला कारणही होतं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी बहुजन वर्गातील मुले शिकावी म्हणून आर्थिकदृष्ट्या मागास गरीब विद्यार्थ्यांना फी सवलत (इ. बी. सी.) दिली होती. सामान्य मुलगा सहज डॉक्टर, इंजीनिअर व्हायचा व तेही माफक फीमध्ये. सन १९८० च्या दरम्यान उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत जितकी वाढ झाली तितकी क्षमता, सोय महाराष्ट्रातल्या इंजीनिअरिंग, मेडिकल कॉलेजमध्ये नव्हती. परिणामी मुलं मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणासाठी कर्नाटकात जात. शासनाची इच्छा मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेज काढायची असून ते काढू शकत नव्हते. कारण अशी कॉलेजीस स्थापन करायला मोठी आर्थिक तरतूद, इमारती, जमिनी, दवाखाने लागते. या अडचणीतून खासगी संस्थांना मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेजीस देण्याच्या इराद्याने (त्या वेळी अशी कॉलेजीस केवळ शासन चालवायचे) विना अनुदान तत्त्वावर खासगी शिक्षण संस्थांना अशी कॉलेजीस देण्याचे धोरण स्वीकारून एका नव्या शैक्षणिक, संस्कृतीचा विकास करण्यात आला.
 हेतू चांगला, पण व्यवहार उलटा होत गेल्याने विना अनुदान धोरणामुळे सुरू झालेल्या शिक्षण संस्था संस्थाने बनल्या. संस्था चालक संस्थानिक बनले. शिक्षण बरकतीचा धंदा होऊन सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या मतदार संघात, साखर कारखाना साईटवर शिक्षण संकुले उभारली. ती पत, पैसा, प्रतिष्ठेची साधने बनली. शिक्षक मजूर, मांडलिक झाला. त्या काळात डी. एड्., बी. एड्. कॉलेजीस मागेल त्याला देण्यात आली. अमाप

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९८