पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चालली आहे. यास शासन, समाज असा जबाबदार आहे तसा स्वत: शिक्षकही. सक्ती केल्याशिवाय तो स्वतः अधिक शिकायला तयार नाही. किमान पात्रता (डी.एड्., बी.एड्. एम्. ए.) व्हायचे अन् त्याच पात्रतेवर निवृत्त व्हायचे. वेळोवेळी निर्धारित केलेल्या पात्रता धारण करण्याचा प्रयत्न न करता संघटनेच्या जोरावर पात्रता शिथिल करण्यासाठी, सूट मिळवण्यासाठी संप करण्यासारखा प्रकार समर्थनीय नाहीच. अलीकडच्या प्राध्यापक संघटनेच्या संपाच्या मागण्या लक्षात घेता शासनाची भूमिका योग्यच ठरते.
 प्राध्यापक, शिक्षकांचा लेखन, वाचन, संशोधन, व्यासंग चिंतेचा ठरावा अशी स्थिती आहे. रकाने भरण्यासाठी, वेतनवाढीच्या अमिषाने केलेली प्रगती खरी नसते. खरा ज्ञानी स्वानंदी विकासक, अध्ययन, अध्यापन पद्धती कालबाह्य झाली, तरी त्या बदलायला शिक्षक तयार नाहीत. अभ्यासक्रम बदलण्याचे स्वातंत्र्य व स्वायत्तता केंद्रीय व राज्य सरकारांनी शिक्षक, प्राध्यापक करताना दिसत नाहीत. पाठ्य-पुस्तके सदोष असणे, त्यांच्या निर्मिती त्रुटीपूर्ण असणे हे त्याचे उदाहरण. नव्या ज्ञान समाजात विद्यार्थी संगणक, मोबाईल, इंटरनेट इत्यादी नवं तंत्रज्ञान व माहितीच्या क्षेत्रात जितके तरबेज होऊन येत आहेत, त्यांच्या ज्ञान व कौशल्यापुढे शिक्षक निरक्षर व निरुत्तर होत आहेत.
 रोजचे अध्यापन पाट्या टाकण्याच्या स्वरूपात होत राहिले आहे. पाट्याच टाका, पण भरून टाका इतक्या माफक अपेक्षांनाही शिक्षक उतरताना दिसत नाही. माध्यमिक स्तरावर क्लासचे वाढते प्रस्थ व महाविद्यालयीन स्तरावर तास चुकवायचे विद्यार्थी (आणि प्राध्यापकांचेही!) वाढते प्रमाण त्वरित हस्तक्षेप व नियंत्रणाची गोष्ट ठरली आहे. विद्यार्थ्यांना शिकावंसं वाटत नाही व शिक्षकांना शिकवावेसे वाटत नाही अशी उभयपक्षी मरगळ क्षेत्रातील भ्रमनिरास सिद्ध करतो आहे.
 अशा सार्वजनिक शिक्षक प्रतिमाभंजनाचे एक कारण वाढती सेवा सुरक्षा, आपोआप मिळणारी वेतनवाढ, वारेमाप वेतनवाढ यामुळे अतिरिक्त सुख व सुरक्षेमुळे सुखावलेल्या शिक्षकास विद्यार्थी, पालक, समाज, शासनाने वेसण घालण्याची वेळ आली आहे. काही सन्मान्य अपवाद व आदर्श शिक्षक आहेत. ते अल्पसंख्य, असंघटित, पापभिरू ठरलेत. ते काही करू पाहतील तर कावळ्यांच्या शाळेत बहिष्कृत ठरतात. शिक्षकांना सन्मान, सुरक्षा, समृद्धी असायलाच हवी पण ती गुणवत्ता विकासाच्या निरंतर प्रयत्नांच्या आधारावर मिळेल तर शिक्षक प्रतिमा पूर्ववत आदर्श होऊ शकेल.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२००