पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुदिन! मानवस्पर्शी शिक्षण श्रेष्ठ खरे, पण जोवर ते अवकाश कवेत घेण्याचे सामर्थ्य संपादन करणार नाहीत तोवर 'वसुधैव कुटुंबकम्' कसे हाती येणार? शिकणे म्हणजे सांगणे व ऐकणं नाही. विचार, विश्लेषण, उपयोजन असा फेर जोवर ते धरत नाही तोवर तो आत्मरंगी पिंगाच राहणार. मल्टिमिडियामुळे शिकणे-शिकवणे प्रभावी होते. ते पारंपरिक शिक्षणापेक्षा रंजक असते. मुलांच्या सुप्त विचारांना, क्षमतांना चालना देते, त्यांना सक्रिय, एकाग्र करते. शिक्षणात सजीवता येते. हालचाल, संगीत, दृश्य, आकृत्या, आलेख, रंग, गती यामुळे ते चिरस्थायी होतं. शिक्षकही त्यामुळे सक्रिय होतो. रोजच्या रटाळ परिपाठातून उभयपक्षी मुक्तता हे केवढे मोठे परिवर्तन ? 'अनुभव हीच खात्री' खर्चीकपणाचा दोष पदरी घेऊनही आपण ऋण काढून सण करतो तसं शिक्षणाचा हा उत्सवही उत्सवीच हवा!
 त्रिमिती वर्ग (Three Dimensional Class) ही अध्यापन शास्त्रातील नवी शिक्षण पद्धती आज जगभर झपाट्याने विकसित होत आहे. थ्रीडी सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी पाहिला आहे. असे वर्ग विकसित करून युद्ध, निसर्ग प्रकोप, काल्पनिक कथा, अवकाश सफर अशा कितीतरी गोष्टी अल्प खर्चात परंतु प्रत्यक्षापेक्षा प्रभावकारी पद्धतीने विद्याथ्यांपुढे सादर करून विद्यार्थ्यांच्या अनुभव कक्षा रुंदावू शकतो. दुसऱ्या महायुद्धाची भीषणता, पर्यावरण नाशामुळे ओढवणारे संकट भविष्यात जगास पर्यावरणशील, अहिंसक बनवण्यास मदत करील.
 'युनेस्को' या आंतरराष्ट्रीय संघटनेने या शतकाच्या पूर्वसंध्येला १९९६ साली शिक्षणासंबंधी एक अहवाल प्रकाशित केला होता. त्याचे शीर्षक होतं 'Learning the Treasure within' त्यात शिक्षणाची चार उद्दिष्टे नमूद होती. (१) जगायला शिकविणे (Learning to be) (२) सर्जनशील बनवणे (Learning to do) (३) सामूहिकता सामाजिकता शिकवणे (Learning to live together) (४) अंतर्विकास करणे (Learning the Treasure within) नव शिक्षणापुढची ही उद्दिष्टे नसून ती आव्हाने आहेत. नवा शिक्षक स्वबुद्धीच्या जोरावर व विकासाद्वारे शिकवू लागेल तेव्हाच ही आव्हाने वर्तमानात पेलणे व उतरविणे शक्य होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने व्यवस्था, वर्तमानास दोष न देता प्राप्त परिस्थितीत जे अधिकाधिक प्रभावी अध्यापन शक्य आहे त्याचा अंगीकार, संकल्प केला तर मात्र हे अशक्य नाही.

•••

संदर्भ :-

 1. WWW.Celt.iastate.edu. 2. www.educationworld.com
 3. WWW.Slideshare.net 4. www.edorigami.org
 5. Life long Learning - Christin Redecker (2008)
 6. The Changing Classroom - Silva Sowa - The Jurnal -(2012)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७६