पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवशिक्षकाची अंकीय साक्षरता


 अंकीय साक्षरता म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम, माहिती तंत्रज्ञान व संपर्क साधनांचे ज्ञान व त्याच्या उपाययोजनाची क्षमता. इंग्रजीत त्याला 'Digital Literacy' म्हणतात. नव्या शिक्षकास भविष्य काळात माहिती, तंत्रज्ञान व संपर्क साधनांद्वारे शिकावे लागेल आणि शिकणे आवश्यक होईल. संगणक, इंटरनेटच्या साहाय्याने तो माहिती शोधू शकेल, तिचे मूल्यमापन (योग्यता, अयोग्यता) करू शकेल. तो प्राप्त ज्ञान आणि संसाधनांच्याद्वारे अध्यापनास आवश्यक आशय, ध्वनिफित, चित्रफिती, आलेख, चित्रे, स्लाईडस, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इत्यादी तयार करू शकेल. नव्या युगाचा शिक्षक आजच्या मौखिक व स्थिर शिक्षण साधनांद्वारे दिल्या जाणाऱ्या ज्ञान व माहितीस रंग, संगती, गती, आकारान्तर, रूपांतर इत्यादीद्वारे वर्गात विद्यार्थ्यांसमोर सादर करू शकेल तर त्याचे शिक्षण प्रभावी, रंजक, सर्जनात्मक, कालसंगत आणि वैश्विक झाल्याशिवाय राहणार नाही.
 अंकीय साक्षरता म्हणजे माहिती, तंत्रज्ञान व संपर्क साधनांच्या कुशल वापराची योग्यता, संगणक साक्षरतेची ही पुढची पायरी. नवे अध्यापन तंत्रात आजकाल नवनव्या साक्षरता व क्षमतांची भर पडत आहे. उदाहरणार्थ स्तरीय साक्षरता (Layered literacy), मध्यमान्तर साक्षरता (Trans Literacy) इत्यादी. अंकीय साक्षरतेसाठी विविध संगणकीय संसाधने (Tools, Softwares) आवश्यकतेनुसार वापरण्याचे कौशल्य आवश्यक असते. माहिती, माध्यमे आणि तंत्रज्ञानाचा योजक वापर करणारा अंकीय साक्षर समजला जातो. विद्यार्थ्यांची येणारी पिढी उपजत अंकीय साक्षर असते. कारण त्यांची खेळणी, खेळ, साधने, मनोरंजन, शिक्षण हे संगणक, टीव्ही., मोबाईल्सद्वारे औपचारिक, अनौपचारिकरित्या त्यांना अंकीय साक्षर करत असतात.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७७