पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्षात घ्यायला हवे. मूल्यमापन म्हणजे केवळ उत्तर पत्रिका नाही. मूल्यमापनात मौखिक, लिखित, प्रात्यक्षिक, स्वाध्याय, प्रकल्प, सर्वेक्षण, पुनर्भरण (Feed Back) परस्परांचे मूल्यमापन, अदलाबदलीने मूल्यमापन या सर्वातून पारदर्शिता, वस्तुनिष्ठता विकसित होऊ शकते. आज केवळ शिक्षकच मूल्यमापक राहिल्याने त्यात व्यक्तिनिष्ठतेचा (Subjectivity) दोष राहात आला आहे.
 नव अध्यापन विविध विषयांच्या संदर्भाना जोडत (Contextual) आंतरशाखीय (Interdisciplinary) होईल तर ते अधिक व्यवहार उपयोगी ठरणार. आपण जे शिकवतो ते व्यवहारात कुठे, कसे उपयोगी पडते ते समजावले तर ज्ञानाची उपयुक्तता वाढते हे शिक्षकांनी लक्षात ठेवून बिंबवायला हवे. आज शाळेत शिक्षक एकटेच शिकवतात. पालकांत, समाजात त्या विषय घटकातील तज्ज्ञ, विशेषज्ञ होऊन त्यांना मुलांपुढे सादर केले, परिचय करून देऊन शिकवायला लावले. त्यांची मुलाखत, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके, त्यांच्यासह भेटी अशा कितीतरी अंगांनी आपले शिकवणे रंजक, उद्बोधक करणे शक्य असते. त्यासाठी पूर्वनियोजन, संपर्क, संवाद संबंध विकसित करायला हवेत. शिक्षक समाजातील होईल तर विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होणार, केवळ शाळेतल्या वेळात शिक्षक राहण्याची भूमिका सोडून 'सर्व वेळ शिक्षक' असा ध्यास जेव्हा शिक्षक घेतील तेव्हाच ते शक्य आहे.
 जगभराच्या अध्यापनाच्या सुमारे १५० पद्धती आहेत. (पहा - http:/teaching.uncc.eclu/learming.... Methods) त्यातील नाट्यीकरण, अभिरूप, सादरीकरण, नकाशे तयार करणे, (शाळा ते मंडई, स्टेशन इ.) संग्रहण, सर्वेक्षण, सांख्यिकी माहिती जमा करणे, त्यांचे वर्गीकरण, विश्लेषण असे जुनेच परंतु नव्याने सातत्याने वापर करणारे शिक्षकच उद्याचा व्यवहारकुशल विद्यार्थी घडवू शकतील. आज विद्यार्थी अंकगणितात १०० गुण मिळवतो, पण दुकानात, बँकेत नोकरीस निरुपयोगी हे चित्र बदलणे गरजेचे. शाळा, महाविद्यालयातील भित्तीपत्रकांत, नियतकालिकांत प्रतिभावान विद्यार्थी प्रतिबिंबित न होता 'संग्राहक', 'भाषांतरीत', 'संकल्पक' दिसतात हे शिक्षकांचे अपयश व कार्यक्षमता मानू त्या दिवशी आपणास प्रज्ञा शोध लागेल. प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थी बसवणे हे नियमित कर्मकांड आहे. ते श्रमसाध्य खरे, पण त्यातून बुद्धिवानाचा, तल्लख बुद्धीचा, स्मरणचतुर विद्यार्थी गवसतो. आज गरज आहे स्वप्रज्ञ प्रतिभांची, ते शोधणाऱ्या शिक्षकाची. अरुणी आहेत जे वाया जाणारे पाणी अडवतील त्यांना प्रेरित करणाऱ्या ऋषीची निर्मिती आपले आजचे आव्हान आहे.
 बहुविध अध्यापनाचे मल्टिमिडिया तंत्रज्ञान शिक्षक अवगत करतील तो

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७५