पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परत उचल खाल्ली. त्यालाही निमित्त घडले. १४ मे १९४९ ला पुण्याला अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार होते. अध्यक्षपदी आचार्य शं. द. जावडेकर यांची निवड झाली होती, या संमेलनात 'आंतरभारती' चा ठराव व्हावा म्हणून साने गुरुजींनी ७ मे १९४९ च्या 'साधना' मध्ये 'प्रांत भारतीचे माझे स्वप्न' शीर्षक लेख प्रकाशित केला. नंतर आठवडाभर पुण्यात प्रचार करून कधी नव्हे ते आचार्य विनोबांच्या 'तुमच्यासारख्यांनी साहित्य संमेलनाला यायला पाहिजे' या आग्रहावरून संमेलनास गेले. तिथे ठराव मांडला, भाषण केले, तो ठराव मंजूरही झाला. त्यापूर्वीच एक वर्ष आधी पुण्यात 'आंतरभारती' संस्थेची विधिवत स्थापना मोठ्या प्रयत्न व प्रचाराद्वारे सन १९४८ ला उत्साहाने करण्यात आली होती. तिचे उद्घाटन प्रख्यात कन्नड साहित्यिक मस्ती व्यंकटेश अय्यंगार यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबईत जोगेश्वरीत 'साधना' व 'आंतरभारती' साठी डॉ. वसंतराव अवसरेंची जागा १४०० रुपये वार्षिक भाड्याचे घेऊन पाडव्याला मुहूर्तही करण्यात आला होता. पण पुढे साने गुरुजींचे ११ जून, १९५० ला निधन झाले व ते स्वप्न अपुरे राहिले.
 या अपूर्ण स्वप्नांचा पाठपुरावा स्वातंत्र्यानंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती संग्राम या दोन चळवळींतून होत राहिला. १ मे, १९६० ला स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र झाला. लगेचच वर्षभराने १९६१ ला गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. या लढ्यात समाजवादी व प्रजा समाजवादी नेते सर्वश्री एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, प्रा. ग. प्र. प्रधान सक्रिय होते, तसे राष्ट्र सेवादलाचे सैनिकही. या यशानंतर 'आंतरभारती' विचार रुजविण्याच्या हेतूने समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी साठोत्तरी कालखंडात उत्तूरच्या आंतरभारती शिक्षण मंडळाकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूर, कुरुंदवाड, इचलकरंजी, कुर्डूवाडी येथे आंतरभारती विद्यालये सुरू केली. नंतर त्यांची नावे बदलली. संस्था स्वतंत्र झाल्या. विकेंद्रीकरण व विभाजन झाले.
 'आंतरभारती' विचाराची शिक्षणातील गरज आजच्या जागतिकीकरणाच्या काळात नव्याने पाहण्याची गरज आहे. काळ बदलला की जनमत बदलते. जनमत बदलले की जनाकांक्षा बदलतात व शिक्षणाचे स्वरूप बदलणे अपरिहार्य होते. शिक्षण संस्था व शाळांचा प्रयत्न सतत समकालीन आव्हानांना सामोरे जात ध्येय व मूल्य उराशी बाळगत कौशल्यांचे शिक्षण दिले तरच विद्यार्थी शाळात येणार व नवे प्रश्न, जीवन पेलू शकणार. या संस्था स्थापन झाल्या तो काळ शिक्षणाच्या दृष्टीने 'थ्री आर' [3R'S] चा होता. Reading, Writting and Arithmetic आलं की शिक्षण

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८६