पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्या युगाच्या शिक्षणाचे आव्हान


 'एक हृदय हो भारत जननी' चे ध्येय धराशी बाळगून साने गुरुजींनी 'आंतरभारती' चे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नामागे रवींद्रनाथ टागोरांच्या 'विश्वभारती' ची प्रेरणा होती. तिचं ब्रीदवाक्य होतं, 'यंत्र विश्वं भवति एकनीडम्' म्हणेच 'वसुधैव कुटुंबकम्.' साने गुरुजींना 'आंतरभारती' चे स्वप्न पडायचे, पण एक कारण होते. सन १९३० च्या कायदेभंग चळवळीत त्यांना अटक करून १७ मे १९३० रोजी धुळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. तो तुरुंग, त्यातील साने गुरुजींची खोली 'राज्य स्मारक' म्हणून जपली आहे. ती मी पाहिली आहे. धुळ्यातून त्यांना जुलै १९३० ला त्रिचनापल्ली (मद्रास) येथे हलविण्यात आलं. इथं ते जवळ-जवळ नऊ महिने (३१ मार्च, १९३१ पर्यंत) होते. या तुरुंगात भारतभरचे सुमारे ३००० कैदी होते. केरळ, मद्रास (तमिळनाडू), आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल येथील राजबंदी या तुरुंगात होते. भारताच्या विविध भाषा, धर्म, संस्कृती, सण, पोषाख, साहित्य, विचार, परंपरांचे एक नवे दर्शन व अनुभव साने गुरूजींना येथे मिळाला. तेथेच त्यांची भेट आचार्य विनोबा भावे, आचार्य स. ज. भागवतांबरोबर झाली. सर्व भाषा व साहित्याने प्रभावित होऊन साने गुरुजींनी 'कुरल', 'शबरी', 'पत्री', 'हृदयाचे बोल', ‘चिंतनिका', 'रामाचा शेला', 'ते आपले घर', 'ही खरी संस्कृती', 'गीता प्रवचने' इ, अनुवाद, काव्य, नाटक, भाषण असे विविध स्वरूपाचे साहित्य लेखन केले. अनेक भाषा व साहित्यांचा अभ्यास व वाचन झाले ते इथेच ! पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केले. (१५ ऑगस्ट, १९४८)

 ते स्थिरस्थावर झाल्यावर 'आंतरभारती'च्या त्यांच्या जुन्या स्वप्नांनी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८५