पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, अमेरिकेने तर सन २००५ मध्येच उच्च शिक्षण आयोग स्थापून उच्च शिक्षणाचे भविष्यलक्ष्यी धोरण अंगीकारण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च शिक्षणात अमेरिका सतत अव्वल ठेवण्याची जबाबदारीही त्या आयोगावर आहे, हे विशेष. अमेरिकेने उच्च शिक्षणात येत्या दशकात १३४ शतलक्ष (कोटी) डॉलर्स ची गुंतवणूक करायचे ठरवून देश विकासात उच्च शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. इंग्लंड त्या मानाने मागे आहे, कारण तिथे शिक्षण अजून शासकीय राहिले असून सार्वजनिक वा खासगी गुंतवणूकीस भरपूर वाव आहे. सन १९७८ पासून चीनने विपणन केंद्रित अर्थनीती (Marketable Economy) चे धोरण स्वीकारले असल्याने तेच धोरण त्यांनी शिक्षणासही लागू केल्याने तेथील उद्योग, व्यापाराबरोबर उच्च शिक्षणातही क्रांतिकारी बदल घडून आले आहेत.
 भारतात शिक्षणाच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसते. खासगी विद्यापीठांना परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय विद्यापीठांची स्थापना होते आहे. शिवाय केंद्र, राज्य सरकारांची उच्च शिक्षणावरील तरतूद ही नित्य वाढते आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय शिक्षण संस्था या सर्वांच्या प्रयत्नांतून उच्च शिक्षण विस्तारले आहे, पण गुणात्मक दर्जा आपणास अद्याप उंचावता आलेला नाही. शिक्षण क्षेत्रातील व विशेषतः शिक्षकांत कार्यसंस्कृतीचा अभाव, समर्पण वृत्तीची कमतरता, नव शिक्षणातील सातत्याचा अभाव, संशोधन वृत्ती नसणे, वाचन लेखन व्यासंगाची कमतरता अशी त्याची अनेक कारणे अशी आहेत तशी शिक्षण संस्थांची कार्यपद्धती, शिथिलता हेही त्याचे एक मोठे कारण आहे. शासकीय नियंत्रणाचा अभाव हे पण महत्त्वाचे कारण म्हणून नोंदवता येईल.
 भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानने एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात उच्च शिक्षण विकासार्थ जे धडाडीचे व धाडसी निर्णय घेतले, त्यातून भारतास बरेच शिकण्यासारखे आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानातही विद्यापीठ अनुदान आयोग होता. त्याची अकार्यक्षमता पाहून ते मंडळ पाकिस्तानने बरखास्त केले. त्या जागी उच्च शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. त्या आयोगास ३.८ शतलक्ष रुपयांचा निधी दिला. प्राध्यापकांचे वेतनमान उंचावले, संशोधनकाची प्रतिष्ठा वाढवली, गुणवत्ता विकास साध्य करण्यासाठी परिणामकेंद्री कार्यक्षमता मापनाचे धोरण राबविले.
 भारताने अलीकडे उच्च शिक्षण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५५