पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शैक्षणिक प्रशासनातील दोष होत. उच्च शिक्षणातील खासगी गुंतवणूक अल्प असणे हेही उच्च शिक्षण विकासाच्या धीम्या गतीचे कारण होय. या संदर्भात अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ आपण अभ्यासायला हवे. पूर्ण स्वयं अर्थशासित हे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत गेली अनेक वर्षे सतत अव्वल राहात आले आहे.
 भारतीय उच्च शिक्षणासंदर्भात अधिकृत सांख्यिकी माहितीचा अभाव, हेही उच्च शिक्षणाची प्रगती मंद असण्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण असे की नियोजनातील काटेकोरपणा हा सांख्यिकी माहितीच्या पायावर उभा असतो. ती माहिती नेमकी हवी. आपल्या उच्च शिक्षणविषयक केंद्र सरकारच्या धोरणातील ताठरपणा ही आपल्या शिक्षण प्रगतीतील धोंड होय. अलीकडे आपण नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करून त्याचे कुलगुरूपद नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्यसेन यांना दिले होते. इथल्या लालफितीच्या कारभाराला कंटाळून त्यांनी मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ऐकून आश्चर्य वाटले नव्हते.
 या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जगभर चालणाच्या उलथापालथी आपण समजून घ्यायला हव्यात. त्यापासून आपणास भरपूर शिकता येणे शक्य आहे. जगातील अनेक देशांतील आर्थिक क्षेत्राबरोबरीने शिक्षणाच्या क्षेत्रातही मुक्त वा उदारीकरणाचे धोरण अंगीकारलेले दिसते. मुक्त व्यापार, गुंतवणूक यांचा संबंध अनेक देशांत उच्च शिक्षण विस्तार आणि विकासाशी जोडल्याचे लक्षात येते. त्यामुळे मोठ्या संख्येने परदेशात मुले शिकतात. त्यातून त्या देशांना उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ आपोआप प्राप्त होते. कार्य परवाना (Work Permit), नागरिकत्व (Citizenship), परवाने (Licence) याबाबतची लवचिकता हेही तेथील उच्च शिक्षण विकासाचे कारण होय. अमेरिका याचे उत्तम उदाहरण होय. जगातील अनेक देश आपले उच्च शिक्षण जागतिक दर्जाचे व जागतिक मागणीचे ठरावे म्हणून आपले शिक्षण विकास धोरण लवचीक व उदार बनवत चालले आहेत. आदर्शाच्या हटवादीपणापेक्षा उपयुक्ततेचे लवचीक धोरणच शाश्वत विकास घडवून आणते, हे त्यांनी अनुभवाने सिद्ध केले आहे. अमेरिका, इंग्लंड, चीनसारख्या देशांनी या आधारे उच्च शिक्षण विकासात मुसंडी मारली आहे.
 अमेरिकेची उच्च शिक्षणातील वाढती गुंतवणूक, चीनची शिक्षणविषयक उदारतेची वाढती धोरणे, इंग्लंडची शिक्षणातील वाढती लवचीकता यांचा लाभ त्या त्या देशातील उच्च शिक्षण गतिमान होण्यात झाला आहे. चीनने तर शिक्षणाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र खुले केले

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५४