पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याची अनेक कारणे आहेत. एक तर आपल्या देशास कुशल, उच्चशिक्षित मनुष्यबळाची जितकी गरज आहे, त्यामानाने तरुण शिक्षित तयार होत नाहीत. खासगी शिक्षणातील व्यावसायिक शिक्षणात जिथे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे लक्ष्य असते, अशा संस्थांत सरकारी धोरण हस्तक्षेप, आरक्षण नीती, प्रशासनिक दिरंगाई इ. अनेक कारणांमुळे गुंतागुंत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणात सातत्यपूर्ण वा शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. तरुण लोकसंख्येचा वाढता रेटा सहन करण्याची क्षमता विद्यमान उच्च शिक्षणात नसणेही महत्त्वाचे कारण आहे. उच्च शिक्षणात अभियांत्रिकी, वैद्यक, शिक्षण या क्षेत्रात 'मागणी व पुरवठा' धोरणाचा अभाव असल्याने भरमसाठ संस्थांना मान्यता देण्याच्या शासनाच्या धोरणामुळे उच्च शिक्षणापुढे काही यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी संस्थांना शैक्षणिक शुल्क ठरविण्याच्या दिलेल्या अधिकारामुळे, सुविधा व शुल्कवाढ यात विषमता असल्याने शिवाय गरजेपेक्षा अधिक पदवीधर निर्माण केल्यामुळे बेरोजगारी, संस्थांत जागा रिक्त राहणे, प्रशिक्षित व पात्र प्राध्यापक न मिळणे या सर्वांतून उच्च शिक्षणापुढे असलेले प्रश्नचिन्ह रोज दैत्यरूप घेते आहे.
 वर्तमान भारतीय लोकसंख्येचे देशास एक वरदान आहे. पुढील काही वर्षे भारत हा जगातील तरुण लाकसंख्येचे आधिक्य असलेला देश राहणार आहे. आपण धोरण ठरवून कार्य करू शकू तर जगास शिक्षित, कुशल मनुष्यबळ पुरवू शकू, देशांतर्गत उद्योग, व्यापार, व्यवसाय, सेवा, वाहतूक, पर्यटन, शिक्षण, संशोधन, श्रमिक गरज इत्यादी क्षेत्रांत गतिशील विकासाद्वारे अर्थविकासाची शक्यता, संभाव्यता मोठी आहे. पण नियोजन अभाव, अपुरी गुंतवूणक यामुळे लोकसंख्येचा महापूर जिरता न राहता वाहात राहून वाया जाण्याचीच शक्यता जास्त दिसते. नवे सरकार घोषणाबाजीत अडकल्याने कार्यक्षम प्रशासनाची वानवा हे आपले वैगुण्य ठरत आहे. जोडीला भ्रष्टाचार, दिरंगाई, कार्यसंस्कृतीचा अभाव ही आपली पारंपरिक अपत्ये अद्याप समाजातील अढळपद सोडायला तयार नाहीत. त्यामुळे सिंगापूर, जपान, फिनलंड, दक्षिण कोरियासारखे द्वीपदेश खंडप्राय भारतापुढील अनुकरणीय आदर्श व आव्हान ठरत आहेत. प्रवेश, समान शिक्षण, समाज व आर्थिक स्थित्यंतर, अभ्यासक्रमात नवता यामुळेच आपण भारतातील विद्यमान उच्च शिक्षणाचा चेहरा-मोहरा बदलू शकू. पण त्यासाठी आवश्यक बांधिलकीची भावना न शासनात आहे, न शिक्षण क्षेत्रात.
 "Education is a powerful catalyst for development. It significantly affects other sectors and vice versa." हे लक्षात घेऊन

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५६