पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व पश्चिम आशिया - ४४%, आफ्रिकी राष्ट्रे - २७%. सन २००९ मध्ये असलेली ही स्थिती. त्यात कालपरत्वे प्रगती झाली आहे. एका गोष्टीची गंभीरपणे आपण नोंद घ्यायला हवी, ती ही की व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असणारा विद्यार्थ्यांचा ओढा गेल्या दशकभराच्या कालखंडात (१९९९ ते २००९) कमी होत चालला आहे. त्यातून लक्षात येते की उच्च माध्यमिक स्तरांवरील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा उंचावणे, सदरचे अभ्यासक्रम आधुनिक गरजानुवर्ती व कालसुसंगत करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होऊन बसले आहे. अशा अभ्यासक्रमांचे स्वरूप पुस्तकी व पारंपरिक राहिल्याने व त्यामुळे हे हुकमी रोजगार मिळवून देण्याचे माध्यम बनू न शकल्यामुळेही ते विद्यार्थ्यांना आकर्षू शकले नाहीत. सदर अभ्यासक्रमांचे विशेषीकरण (Specialization) होणे जसे अत्यावश्यक आहे, तसे ते समकालीन गरजा, कौशल्ये यांना पूरक होणेही महत्त्वाचे आहे.
 माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांतील मुला-मुलींच्या प्रमाणातील विषमता जागतिक चिंता नि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे, ते जगापुढचे आव्हानही बनले आहे. सन १९९९ ते २००९ या दशकात निम्न माध्यमिक स्तरावर पटनोंदणीच्या पातळीवर सन १९९९ ला असलेले मुलींचे प्रमाण ६९% होते. ते २००९ मध्ये ७६% झाले, ही खचितच स्वागतार्ह बाब आहे. अशीच वाढ उच्च माध्यमिक स्तरावर ही जगभर दिसते आहे. या स्तरावरील ४३% चे प्रमाण ५५% पर्यंत वाढविण्यात जगास यश आले आहे. अरब आणि आफ्रिकी राष्ट्रातील मुला-मुलींच्या प्रमाणातील विषमतेची दरी मात्र चिंताजनक आहे. विशेषत: निम्न माध्यमिक स्तरावरची ही विषमता गंभीरपणे नोंद घेण्याची गोष्ट ठरली आहे. युनेस्को ही विषमता दूर व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. पायाभूत इयत्तांमध्ये असलेले हे प्रमाण उच्च माध्यमिक स्तरावरही तसेच राहते, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता, सार्वत्रिक माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट कालबद्ध मर्यादेत पूर्ण करणे अवघड होऊन बसते. ज्या राष्ट्रांमध्ये मुलामुलींचे माध्यमिक स्तरावरील प्रमाण समसमान आहे, अशा प्रगत युरोपीय राष्ट्रांमध्येही ग्रामीण व गरीब समाजात लैंगिक विषमता आढळते, हे वास्तव आहे.
 सन १९९० ते २००९ या दोन दशकांच्या कालावधीत जगभर माध्यमिक शिक्षकांच्या संख्येत वाढ दिसून येते ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण आपण राखू शकलो. जगभर असेही दिसून येते की प्राथमिक शिक्षकांच्या तुलनेने माध्यमिक शिक्षकांचे वेतनमान

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३९