पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपणाला गाठता आले नाही. २०२० पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्याचा जगाने चंग बांधला आहे.
 ताज्या आकडेवारीनुसार जगातील १६२ देशांपैकी ९१ देशांतील सर्व मुले आता प्राथमिक स्तराचे शिक्षण पूर्ण केलेली असणार आहेत. विशेष म्हणजे या देशांतील मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचे प्रमाण समसमान असणार आहे. गमतीची गोष्ट अशी की या ९१ देशांपैकी ४७ देशात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असणार आहे, तर २४ देशांत मुलांचे प्रमाण कमी राहणार आहे. लिंग समानता व लैंगिक विषमता या दोन्ही अंगाने विचार करता हे प्रमाण पूर्वीच्या तुलनेने आशादायक व आश्वासक होते आहे, हे विशेष.
 युनेस्को सांख्यिकी संस्थेच्या (UIS) नव्या सूचकांकानुसार (Indicators) प्राथमिक शिक्षणाकडून माध्यमिक शिक्षणाकडे अग्रेसर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मध्यपूर्व युरोप, मध्य आशिया, उत्तर अमेरिका व पश्चिम युरोपातील देशांमध्ये हे प्रमाण ९५% असणार आहे, परंतु दुसरीकडे आफ्रिका खंडातील अविकसित वा विकसनशील देशांत मात्र हे प्रमाण १७% ते ३०% इतके कमी असणार आहे. यातूनही माध्यमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याचे जगाचे स्वप्न किती कठीण आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही.
 सन १९९९ पासून माध्यमिक शिक्षणाचा प्रचार, प्रसार, आणि प्रमाण जगभर सातत्याने वाढत असले, तरी सार्वत्रिक माध्यमिक शिक्षण (Universalization of Secondary Education) उद्दिष्टापासून ते अद्याप फार दूर आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. निम्मस्तरीय माध्यमिक शिक्षण (इ. ५ वी ते इ. ७ वी) स्तरावर सकल नोंदणी प्रमाण (Gross Enrollment Ratio) ७२% वरून ८०% वर गेले आहे, ही आशादायक गोष्ट आहे. परंतु आफ्रिकी देशातील या स्तराचे हे प्रमाण अद्याप २८% ते ४३% च्या घरात आहे, हे आपणास दुर्लक्षून चालणार नाही. जगातील ८०% देशांमध्ये माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. (भारताला ही मजल केव्हातरी गाठावीच लागेल.) जगातील एक तृतीयांश देशात निम्नस्तरीय माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्याने आपण या स्तरावर ९०% यश कमावू शकलो असलो, तरी ते पुरेसे नाही.
 अनेक विकसनशील देशांमध्ये अद्याप उच्च माध्यमिक शिक्षण सक्तीचे नाही. उच्च माध्यमिक शिक्षणाची जागतिक सरासरी ५६% आहे. पण त्यापेक्षा कमी टक्केवारी असलेले देश आहेत, अरब राष्ट्रे - ४८%, दक्षिण

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३८