पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिक आहे. शिवाय सुविधा वाढविणारे राहिले आहे. मात्र आफ्रिकी देश यास अद्याप अपवाद आहेत. तिथे सर्व स्तरांवर शिक्षक वेतनमान जागतिक प्रतवारी व प्रमाण पाहता कमी आहे. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील राष्ट्रांमध्ये मात्र प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वेतनमानात नगण्य अंतर आढळते. याचे सर्वत्र अनुकरण अपेक्षित आहे.
 जगामध्ये ७२ दशलक्ष मुले अद्याप शालाबाह्य आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे अग्रक्रमीय कार्यक्रम म्हणून सर्वमान्य झाला आहे. जगात सर्वत्र याबाबत विशेष मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. भारतातही हे प्रयत्न प्राधान्याने होत आहेत. आफ्रिकी राष्ट्रांमध्ये अन्य प्रश्नांप्रमाणे हाही ऐरणीवरचा प्रश्न आहे. अद्याप शाळेतच न गेलेल्या मुलांचा हा 'लक्ष्यगट' जगापुढचे खरे आव्हान आहे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी १९% विद्यार्थी शाळा सोडलेले आहेत तर ८१% मुलांनी अद्याप शाळेचा उंबरा ओलांडलेला नाही.
 शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा विचार करता असे दिसून येते की सकल घरेलू उत्पादनाच्या (GDP) १.७% प्राथमिक शिक्षणावर खर्च होतात, तर माध्यमिक शिक्षणावर मात्र १.६%. सन २००९ चे हे जागतिक चित्र. यातूनही माध्यमिक शिक्षणाची जगभरची अनास्था अधोरेखित होते. माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चातही जगभर वैविध्य आढळते. कुठे अधिक तर कुठे कमी खर्च होतो. ज्या देशांत माध्यमिक स्तरावरील पटनोंदणी प्रमाण अधिक आहे, तेथील शाळांवर होणारा खर्च प्राथमिक व उच्च शिक्षण खर्च प्रमाण पाहता कमी होतो ही वस्तुस्थिती आहे. यातूनही माध्यमिक स्तराकडे होणारे जागतिक दुर्लक्ष स्पष्ट होते.
 या सर्व पार्श्वभूमीवर येत्या काळात माध्यमिक शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरविण्याची, अधिक खर्च करण्याची व अधिक सुधारणा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे येते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेली ९५% मुले माध्यमिक स्तरावर प्रवेश घेतात, असे सर्वसाधारण जागतिक चित्र आहे. अविकसित व विकासशील देशात अर्थातच हे प्रमाण वरीलपेक्षा कमी आहे. माध्यमिक शिक्षणासंदर्भातील मागणी व पुरवठा प्रमाण विषम असणे, हाही एक जागतिक चिंतेचा विषय आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
 जगातील अनेक देशांत उच्च माध्यमिक शिक्षणाची जी गरज आहे, त्यापेक्षा कमी शाळा, संस्था उपलब्ध होतात असे चित्र आहे. ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेची वर्तमान काळातील आवश्यकता लक्षात घेता माध्यमिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४0