पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजीव सभासद हवेत. (ते पतसंस्थेचे असतात!) घरी वर्तमानपत्र हवे पण त्यापेक्षा दर्जेदार शैक्षणिक, अध्यापन विषयक मासिके हवीत. आपल्या विषयाची कात्रणे ठेवण्याचा छंद हवा. शिक्षकांनी व्याख्यानांना (वैचारिक साहित्यिक) हजेरी लावायलाच हवी. यातूनच शिक्षक बहुश्रुत होतो. आपल्या विचारांचे श्रेष्ठ ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, छायाचित्रे, सीडीज, क्लिप्स, व्हिडिओज, घरी हवेच. फुरसतीच्या वेळात वाचन, ऐकणे, पाहण्याचा रियाज त्याला/तिला ताजातवाना करत रहातो. तरुण ठेवतो. (वय कितीही असू दे!) नव्या शिक्षकांनी नवे प्रदेश, विदेश पाहिले पाहिजे. "Seeing is believing" हे शिक्षण तत्त्व सर्व विषय शिक्षकांना लागू आहे. 'केल्याने देशाटन' सारखे लोकशिक्षण व लोकवाचन नाही.
 शिक्षकांनी नुसते वाचत राहायचा काळपण केव्हाच मागे पडला आहे. आता शिक्षकांनी व्याख्याते, लेखक, संशोधक, अनुवादक, इतिहासकार, संपादक होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असे कार्य त्याचे शिक्षक व्यक्तिमत्त्व फुलवेल. शिक्षक गायक, चित्रकार, वैज्ञानिक, खेळाडू, वक्ता हवा तसा अभिनेताही. वाचन त्याला हे सर्व करण्याची, होण्याची क्षमता देईल. रोज वाचल्याशिवाय न झोपणारा शिक्षक सजग, 'दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे' असा समास लिहिणारा कवी खरा शिक्षक-प्रशिक्षक होता. त्याने वाचन, लेखन, विचारावर विचार केला होता. तशीच ती बहिणाबाई. नारायण सुर्वेही तसेच. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेही. प्रत्येकाने वेगळे, वेगळे लिहिले, पण जग आणि जगणे समजावले. तुकोबा, कबीर, मार्टिन ल्यूथर किंग, खलील जिब्रान, गॉर्की, प्रेमचंद, शेक्सिपिअर, वि. स. खांडेकर, सान्यांनी आपापल्या काळात शिक्षकांना दृष्टी दिली. सर्वांकडून सर्व नाही घेता येणार. ओंजळ पुरेशी! लिओझू म्हणाला होता, 'A journey of thousand miles begin with a single step.' (हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पावलाने सुरू होतो!) तेच खरे !

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६५