पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाची नवी उपक्रमशीलता


 'गेला बाजार बरा होता' म्हणायचा व्यापाऱ्यांचा प्रघात आहे. तसा शिक्षकांचाही. असे म्हणायचा प्रघात आहे की, 'गेले वर्ष बरे होते!' जे काही असायचे ते असू दे... 'बीत गई, बात गई' म्हणत जुनं विसरून जाऊ, 'जुने जाऊ द्या मरणालागुनी!' आपण नवा डाव मांडू नवा विचार करू, येणारे शैक्षणिक वर्ष उपक्रमशील करण्याचा प्रयत्न करू!
सुट्टी
 आपल्या उपक्रमशीलतेचा विचार आपण सुट्टीपासूनच करू या. उपक्रम म्हणजे प्रकल्प साहस, एखादी गोष्ट हाती घेणे, मनावर घेणे, नवी करणे, जुनी गोष्ट नव्याने, नव्या पद्धतीने करणे, कृती, संशोधन प्रकल्प हाती घेणे असं सर्व करणे म्हणजे उपक्रम करणे होय. उपक्रमशील शिक्षक, सतत नवे, बालसंगत, आव्हानात्मक, नवे उद्दिष्ट घेऊन काम करतो. 'सुट्टी' हाच उपक्रम घेऊ. भारत हा सुट्टयांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. वर्षाचे दिवस ३६५. सुट्यांचे दिवस १८०. शिक्षक अर्ध वर्ष शिकवतो व अर्ध वर्ष आराम करतो.
 आरामाचे, सुट्टीचं अर्ध वर्ष उपक्रमशील कसे करता येईल? तर पहिले म्हणजे एक 'इअर प्लॅनर' घेऊ. बाजारात एक कॅलेंडर मिळते. एका मोठ्या कागदावर वर्षाचे बारा महिने व ३६५ दिवस आखलेले असतात. प्रत्येक दिवसाचा रकाना कोरा असतो. तो आपण आपल्या योजना, नियोजनाप्रमाणे भरायचा. म्हणजे वर्षाच्या प्रत्येक दिवसाचे नियोजन करायचे नि ते कृतीत, अमलात आणायचे. वार्षिक डायरीत दर महिन्याच्या शेवटी, प्रारंभी असा 'प्लॅनर' असतो. प्रत्येक सुट्टीचं, वर्षभरातल्या प्रत्येक सुट्टीचे नियोजन करता येईल. नवा शिक्षक सुट्टीत वाचन, अध्यापन तयारी, सहल नियोजन, सहल

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६६