पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाची नवी वाचन साक्षरता


 शिक्षक मुळात ज्ञानसाधक असतो. त्याचे काम ज्ञानवहनाचे तसच ज्ञान निर्मितीचेही असते. ज्ञानाची संकल्पना, निर्मिती, अभिव्यक्ती, अभिसरण कालपरत्वे बदलते. पूर्वी गुरुजी संथा द्यायचे. म्हणजे रोज थोडं थोडं शिकवायचे. त्यांचे शिकवणे पोपटपंची प्रकाराचे असायचे. एकतर ते पाठांतर करायचे. दुसरे पाठांतरीत सामुग्रीचे निरूपण करायचे. या काळात पाठांतर व त्याचा गद्यविस्तार म्हणजे शिक्षण होते. मग लेखन आले. लेखन आले तसे कित्ता आला. कित्ता म्हणजे गिरवणे. नंतर स्वाध्याय आला. प्रश्नोत्तरे आली. शिक्षकांनी शिकवलेल्या भागावर शिक्षक प्रश्न देत. विद्यार्थी शिक्षकांनी ज्ञानावर आधारित स्मरणाला आधारे उत्तर लिहीत. आजही हा प्रकार सुरू आहे. एकाच उत्तराला वेगवेगळे गुण मिळतात. ते स्मरण, आकलन, शैली, शब्दरचना, शुद्धता, चूक, बरोबर या आधारे. म्हणजे अभिव्यक्ती व अभिसरण क्षमतेवर आज ज्ञानात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. पूर्वी कल्पना विस्तार, रसग्रहण, विवेचन, ससंदर्भ स्पष्टीकरण, आवृत्ती, नकाशे, आलेख, कृती पद्धती यांना महत्त्व होते. विशेष गमतीची गोष्ट म्हणजे ज्ञानाची झेरॉक्स म्हणजे गुणवत्ता समजले जायचे. उदाहरणासह सांगायचे झाले तर विज्ञानाचे देता येईल. विज्ञानही आपण झापड लावून शिकवत होतो. पूर्वी शिक्षक प्रयोग करून दाखवायचे. विद्यार्थी प्रयोगाचे अनुकरण करायचे. प्रयोग वहीही झेरॉक्स असायची. या झेरॉक्स ज्ञानपद्धतीतचा विस्तार सांसर्गिक रोगासारखा फैलावतो आहे. इंजीनिअरिंग, मेडिकलचे विद्यार्थी, हुशार मुलांची जर्नल्स, नोट बुक्स झेरॉक्स करून अभ्यास करतात. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशाखा खरे म्हणजे ज्ञाननिर्मिती, प्रयोग, संशोधनाच्या, पण तिथंही गिरवून काढणे म्हणजे जर गुणवत्ता ठरत असेल तर या विद्याशाखांचे आपण नोबेल अपेक्षिणे चुकीचे नाही का?

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६०