पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शिक्षण पद्धतीत जर प्रयोग, प्रकल्प, नावीन्य शोध, वेगळेपणा यांना स्थान व महत्त्व असेल तरच ज्ञान निर्मितीत सातत्य व नवता येणार. त्यासाठी नव शिक्षकांनी ज्ञानरचनावादाही चिकित्सा करत सतत नवे वाचन, नवे चिंतन, नवे मनन, नवे संशोधन, नवलेखन केले पाहिजे. या सर्वांचा पाया आहे नववाचन. नव शिक्षकाच्या वाचनसाक्षरतेच्या संकल्पना, पद्धती बदलून गेल्यात. नवा शिक्षक एकविसाव्या शतकातही मुद्रितात अडकून राहील तर तो पाच-पन्नास वर्षे मागेच राहणार. ‘ई रीडर टीचर' ही नव्या शिक्षकाची ओळख आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे.
 वर्तमान शतकातील साक्षरतेच्या कल्पनाही नव्या आहेत. विसाव्या शतकातील साक्षरतेचा संबंध अक्षरज्ञान व अंकज्ञानाशी येतो. एकविसावे शतक हे संगणक साक्षरतेचे आहे. संगणक साक्षरता ही अंक व अक्षर वाचन व लेखनाशी निगडित नाही. तिचा संबंध ज्ञान प्रक्रियेच्या नव्या चौकटीशी आहे. त्यात संगणक वापर कौशल्य, टंकन, प्रलेखन (programming) वेबसाइटस् शोध, इंटरनेटवरील माहितीचे वाचन, संकलन, संग्रहण, संपादन, पुनर्वापर, प्रक्रिया, प्रतिसाद, लेखन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यामुळे बुद्धिमत्तेची संकल्पनाही बदलून गेली आहे. स्मरणशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता, पाठांतराची अभिव्यक्ती म्हणजे विद्वत्ता या कल्पना मागे पडल्या आहेत. आता शिक्षणापेक्षा समाज, शहाणपणाला (understanding and wisdom) यांना महत्त्व आले आहे. तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा त्या माहितीचा उपयोग तुम्ही किती कल्पकतेने, नव्या पद्धतीने करता याला महत्त्व आले आहे. 'Don't act indifferent, act differently' हा नव्या युगाचा मंत्र आहे.
 वर्तमानाचे परिसरातील महत्त्वाचे प्रश्न कोणते याचे शिक्षकाचे स्वत:चे आकलन महत्त्वाचे. सामान्य माणसे बातम्या वाचतात. शिक्षकाने संपादकीय, लेख, स्तंभ, प्रतिक्रिया, विश्लेषण वाचायला हवे. ते वाचले तरच त्याचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, मत स्वतंत्र, जीवनशैली स्वतंत्र होणार व तो वेगळेपणाने विचार करणार व वागणार. शिक्षक एका विषयाचा न रहाता सर्व ज्ञानविज्ञानाचं वाचन, आकलन असेल तर तो आपला विषय विविध ज्ञानविज्ञानाशी जोडून आंतरशास्त्रीय पद्धतीने समन्वित दृष्टिकोन घेऊन शिकविणार. त्याला ज्ञानाच्या महाजालातून चोखंदळ निवडता येणे हे नवे युगाचं कौशल्य माहीत हवे. आपण संगणकाद्वारे महाजालावर जातो. एखादा विषय शोधू लागतो. संबंधित विषयांची अनेक संकेतस्थळे, ज्ञानलहरी (website and Links) आपणाला खुणावू (blink) लागतात. आपण संक्षिप्त माहिती वाचतो व निवड करून (click) करून विस्ताराने वाचन करतो. उपयुक्त वाटले की,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६१