पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढे अनेक जण मागणी करू लागले म्हणून त्यानं काही धडे २००६ ला 'यू ट्यूब' वर टाकले व तो जगप्रसिद्ध शिक्षक बनला. त्याचे धडे आजवर साडेतीन अब्ज विद्यार्थ्यांनी गिरवले आहेत. तेही मोफत! 'फोर्ब्स' मासिकाने जाहीर केलेल्या जगातील श्रीमंत माणसांच्या यादीत तो चमकला आहे.
 नव्या शिक्षकासाठी आवश्यक, शिक्षण साधन बनवण्यात व ती स्वस्त दरात विकण्यात आजमितीस चीन हा देश आघाडीवर आहे. कधी काळी एक शिक्षक एका विद्यार्थ्यास शिकवायला (one to one) नंतर (Each one, Teach one) चा काळ आला. तो ऑनलाइन एज्युकेशन (E-Education) मध्येही अवतरला आहे. आता तुम्हाला पंढरपूरला राहून पॅरिसची ट्यूशन करता येते तशी टूरपण. आता एखाद्या शिक्षकाने ठरवले तर आपल्या घरी बसून आभासी विद्यापीठ (Virtual University) सुद्धा स्थापन करू शकतो. काही नाही, एक संगणक घ्यायचा. इंटरनेट कनेक्शन त्याला जोडायचे. आपली वेबसाईट तयार करायची. आपला अभ्यासक्रम परीक्षा, ट्यूटोरियल्स, डिग्री तयार करायची. प्रवेश घ्यायचा. ऑनलाईन शिकवायचं. ऑनलाईनच परीक्षा. डिग्रीपण ऑनलाईन मिळते.
 इतिहास, काळ, अंतर संपल्याची घोषणा करणाऱ्या एकविसाव्या शतकात आता सुरू असलेल्या शाळा, कॉलेजीस, विद्यापीठे ओस पडली, शिक्षक बेकार झाले तरी खऱ्या, नव्या शिक्षकाला नव साधनसंपन्न, कुशल शिक्षकाला मरण नाही. एखाद्या संस्थेस पाच-पंचवीस लाख रुपये देऊन शिक्षक, प्राध्यापक होण्यापेक्षा अत्यंत कमी पैशात तुम्ही ऑनलाईन शिक्षक होऊ शकाल, पण त्यासाठी तुम्ही संगणक कुशल, ज्ञानसंपन्न व प्रभावी अध्यापक असले पाहिजे.

•••

संदर्भ :-

 1. www.issu.com
 2. www.edutechwiki.unige.ch
 3. www.educationworld.com
 4. www.khanacademy.org
 5. www.dodea.edu

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५९