पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरील साधने तुम्हास आधुनिक वाटली, तरी ती विज्ञानाच्या दृष्टीने जगाच्या वर्तमान विकासाच्या संदर्भात विसाव्या शतकातील होत. त्यांना एकविसाव्या शतकातील शिक्षक व्हायचा ध्यास लागला असेल. त्यांना मी सांगेन की तुम्ही नव्या आभासी जगाचा, आभासी शिक्षणाचा (Virtual World and Education) अभ्यास करा. नवे जग समजून घ्या. शिक्षणाची नवी साधने, पद्धती समजून, शिकून घ्या. त्याला काहीच करायचे नाही. तुम्ही फक्त संगणक साक्षर व्हायला हवे नि तुम्ही महाजालाचे वेड (Net Savvy) लावून घ्यायला हवे. माझ्यासारखं. मी आता पुस्तकं वाचून द्यायचे सोडले आहे. लिहायचे सोडले आहे. मी ई-रिडींग करतो, मेल करतो, टाइप, सेंड, फॉरवर्ड, कट, पेस्ट हेच माझे जीवन व्यवहार, जीवन कौशल्य होऊन गेले आहे. माझा सारा ज्ञान व्यवहार आता आभासी जगाशी संबद्ध झाला आहे. तसाच तुमचाही व्हायला हवा. इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे, वेबसाइट्स, ज्ञानलहरी (लिंक्स) आहेत. त्या तुमच्या सर्व शिक्षकी गरजा पूर्ण करण्यास उतावीळ आहेत. तुम्ही ब्लॉग्ज, ट्विटर, फेसबुक शब्द ऐकून असाल. (नसाल तर एकदा समजून घ्या.) या सोशल नेटवर्किंग साइटस् होत. त्यांच्याद्वारे आपण जगातील कुणाशीही, केव्हाही संवाद, आदान, प्रदान, सहभाग, प्रतिसाद, समर्थन इ.द्वारे संबंध जोडून आपलं शिकणंशिकवणे, समृद्ध, संपन्न करू शकतो. 'ट्विटर' (Twiter) द्वारे आपण जगातील आपल्या विषयाच्या शिक्षकांशी संवाद करून आपले व्यावसायिक कौशल्य वाढवू शकतो. 'ब्लॉग' (Blog) द्वारे आपण आपल्या विषय संदर्भातील एखाद्या बाबीवर मत व्यक्त करून इतरांचे म्हणणे जाणून घेऊन आपले मत अधिक स्पष्ट, व्यापक, टोकदार, माहितीपूर्ण करू शकतो. (बऱ्याचदा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५६