पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नव्या माहिती, तंत्रज्ञान, संगणक, इंटरनेटमुळे तर आपले वर्तमान शिक्षणच कालबाह्य ठरवलं असल्याने शिक्षकास नवनवी साधने वापरण्याचे कौशल्य अवगत करणे अनिवार्य झाले आहे. एके काळी स्टेथेस्कोप वापरणारा डॉक्टर मोठ्ठा मानला जायचा. आता एका डॉक्टरकडे एका रोगाची, अवयव उपचाराची, सर्व साधने जमा करणे अवघड होऊन बसले आहे. तीच गोष्ट शिक्षकांची झाली आहे. भूगोल शिक्षकाला एके काळी पृथ्वीचा गोल हाती असला की, ब्रह्मांड शिकवण्याचे सामर्थ्य यायचे. आता शाळेत वेधशाळा, तारांगण, अवकाशवेध घेणारी दुर्बीण, जीपीएस सारे हवे. पूर्वी भाषा शिक्षकाला बोलता, गाता, नाचता आले की, पुरेसे व्हायचे. आता त्याला कॅसेट, सीडी, रेकॉर्डस्, एम. पी. थ्री., फिल्म म्युझिक सिस्टिम, कॉम्प्युटर लॅब, लॅपटॉप, लँग्वेज लॅब, इंटरनेट, लेसर प्रोटेक्टर, थिएटर, थ्रीडी शो, सारं जग लागते. हे कमी, अधिक प्रमाणात साऱ्यांच विषयांचे झाले असल्यामुळे शिक्षकाची स्थिती ऑर्केस्ट्रा कंपोझरसारखी झाली आहे. त्याला सारी वाद्ये, सूर, ताल एकासुरात गोवता यावे लागतात तसे शिक्षकास आपला विषय सर्व ज्ञान-विज्ञानाच्या संदर्भात (आंतरशाखीय - Inter Disciplinary) शिकवता येणं अपेक्षित असल्याने नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली नवी साधने वापरण्याचे त्याला ज्ञान व कौशल्य दोन्ही आवश्यक आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५५