पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. ते सरकार नियंत्रित आहे. जे स्वातंत्र्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे, ते मराठी माध्यमाच्या शाळांना नाही. मराठी माध्यम शाळा व व शिक्षकांचे प्रकार, वर्ग पाहता समान शिक्षण, सार्वत्रिक शिक्षण हे केवळ धोरण म्हणून कागदावर आहे. व्यवहार सर्वथा भिन्न आढळतो. शिक्षण खात्याकडे गुणवत्ता, विकास नियंत्रण आहे. तेथील अधिकारी सुमार वकूबांचे असतात. केवळ अधिकार आहे म्हणून प्रतिष्ठा, मान. संस्थाचालक व्यापारी झाल्याने व त्यांच्या हाती नियुक्ती, बदली, बढती असल्याने त्यांना शिक्षक जुलमाचा रामराम करतात. शिक्षकांच्या सेवाशर्ती, वेतन, सेवा शाश्वती शासनमान्य असल्याने व यंत्रणेत गुणवत्तेऐवजी सेवा ज्येष्ठता निहाय असल्याने शिक्षकात विकासाची ऊर्जा अपवादाने दिसते. जी अर्हता धारण करून ते व्यवसायात येतात त्याच अर्हता, पात्रतेत ते निवृत्त होतात. सन्मान्य अपवाद वगळता पात्रता विकास आढळत नाही. जो आहे तो वेतनवाढ गृहीत धरून होतो.
 मग नवा शिक्षक घडणार कसा? असा प्रश्न आहे. त्याचे उत्तर सोपे असले तरी, प्रत्यक्षात येणे कठीण. शासन, संस्था, शाळा, काय असायचे ते असो. प्राप्त परिस्थितीत पर्यावरणाची तमा न बाळगता मी शिकत राहणार. गुणवत्ता वाढवणार. नव-नवी कौशल्ये आत्मसात करणार. नित्य वाचन करणार. लेखन, संशोधन, व्याख्याने, समाजकार्य, उपक्रम इत्यादीद्वारे मी स्वत:चा विकास करणार व समाज साहाय्यभूत होणार. माझे सहकारी, परिसर काहीही असो मी त्यांना छेद देत 'एकला चलो रे' म्हणत माझ्या विवेकाच्या कसोटीवर अध्ययन, अध्यापन, संशोधन, उपक्रम करणार, ते माझी बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे म्हणून! काळ, परिस्थिती कितीही विषम असो, विद्यार्थी हा घटक असा आहे की, तो शिक्षक सापेक्ष असतो. शिक्षक त्याच्या लेखी दैवत असतो. पालकांपेक्षा त्याची श्रद्धा, आज्ञाकारिता, स्वीकृती शिक्षकांप्रती अधिक असते. अशा विद्यार्थ्यांशी आपण पाट्या टाकून द्रोह करत असू तर आपणासारखे करंटे कोणीच नाही. देशाची जडणघडण पाहूनच लक्षात येते की, त्या देशातले शिक्षण कसे असेल व शिक्षक कसे असतील?
 नवा शिक्षक निरंतर शिकणारा हवा. त्याचं वाचन चतुरस्र हवे. तो

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४३