पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

future' (शाश्वत भविष्यासाठी वर्तमान शिक्षण) हे या परिषदेचे बोधवाक्य, लक्ष्य आहे. यातूनही बरंच सुचवलं गेलं. सन २००९ च्या परिषद निर्णयानुसार शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील औपचारिक, अनौपचारिक शिक्षणात सुसूत्रता आणली जाणार आहे. अभ्यासक्रम पुनर्रचनेत शिक्षक प्रशिक्षणात मूलगामी बदल करून शिक्षक गुणवत्तेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. शिक्षण बदलात विद्यार्थ्यांचे मत घेतले जाणार आहे. शिक्षणातील लिंग असमानता (स्त्री-पुरुष शिक्षण भेद व विषमता) दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. ज्ञान समाज निर्मितीसाठी वैश्विक सहकार्य व संघटन मजबूत केले जाणार आहे.
 भारतातही राष्ट्रीय व राज्य पातळीवर मोठे बदल येऊ घातले आहेत. शिक्षण अधिकारांतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या सक्तीच्या व मोफत शिक्षणामुळे राष्ट्रीय स्तराची एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने आपणाकडील प्राथमिक शिक्षण इ. १ ली ते इ. ८ वी झाले असून त्या अनुषंगाने विद्यमान प्राथमिक, माध्यमिक, शाळांची, शिक्षकांची पुनर्रचना अपेक्षित आहे. ८+२+२+३ असा नवा शैक्षणिक आकृतीबंध आला आहे. (प्राथमिक ८ वर्षे+ माध्यमिक २ वर्षे + उच्च माध्यमिक २ वर्षे + पदवी ३ वर्षे) प्राथमिक स्तरावर साक्षरता अभियान, सर्व शिक्षा अभियानानंतर आता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान बाराव्या पंचवार्षिक योजना काळात (२०१२ ते २०१७) यशस्वी केले जावयाचे असल्याने माध्यमिक स्तरावर भौतिक सुधारणा व शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने मूलभूत बदल अपेक्षित आहे. उच्च शिक्षणात राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या (Nation knowledge commission) शिफारशींनुसार उच्च शिक्षणाची सुधारणा व पुनरुज्जीवन (Renovation and Rejuvenation) करण्याच्या उद्देशाने लोकसभेत कायदा झाला असून खासगी, विदेशी, केंद्रीय विद्यापीठे, महाविद्यालये, अभ्यासक्रम, पदव्यांचे पेव फुटून उच्च शिक्षण स्वयंअर्थशासित व स्वायत्ततेकडे वाटचाल केलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
 या सर्व पार्श्वभूमीवर आपण जेव्हा मोठ्या शिक्षकाच्या घडणीचा विचार करू लागलो तेव्हा एकूणच शिक्षण, शासन, समाज, शिक्षक, पालक, विद्यार्थी असे काय काय चित्र उभे राहते? आपले शिक्षण स्वायत्त

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४२