पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी अशा स्वरूपाचं तिचे महत्त्व आहे. त्यामुळे एकूणच भारतीय शिक्षण पद्धतीत सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षण, संशोधन, निरीक्षण, नियंत्रण, गुणवत्ता विकास इ. सर्वच स्तरावर सुधारणेस भरपूर वाव आहे.
 भारतात सध्या २१.८ दशलक्ष विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षण संस्थात संख्यात्मक वाढ होते आहे. गेल्या काही वर्षांत भारतात नव्या ६५ केंद्रीय संस्था, ८९ विद्यापीठे, ४००० महाविद्यालयांची भर पडली आहे, तरी आपण १५% प्रवेशाचे उद्दिष्ट गाठू शकलेलो नाही. संख्यावाढीबरोबर गुणवत्ता संवर्धनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'मागणी व पुरवठा' यांचा मेळ व घातला न गेल्याने सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न यक्षप्रश्न बनत असण्याच्या विद्यमान काळात उच्च शिक्षण व रोजगार संधी, क्षमतांची सांगड आता अनिवार्य झाली आहे. उच्च शिक्षणात शिक्षकाची कमतरता भासते आहे. त्यामुळेही दर्जा खालावत आहे. २००४ साली भारत सरकारने सर्व संलग्न, मान्यता, नियंत्रक संस्थांची प्रातिनिधिक समिती नेमून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता वाढीचा विचार केला. अनेक आयोग नेमले. उदा. नॅशनल नॉलेज कमिशन. सॅम पित्रोदा यांनी ग्रंथालये, पीएच.डी. असे स्वतंत्र ८ अहवालही सादर केले. प्रो. यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली कार्य समिती नेमण्यात आली होती, प्रत्यक्षात कार्यवाही मात्र प्रभावी होऊ शकली नाही. आर्थिक तरतुदीच्या अभावाचे तुणतुणे आपण जोवर वाजवत राहणार, शिक्षकांचे कार्याचे लेखापरीक्षण करणार नाही, संशोधन दर्जा उंचावणार नाही व आपली विद्यापीठे जोवर संशोधन, पेटंट बळावर स्वयं अर्थशासित होत नाही तोवर प्राध्यापकांना पगार व विद्यार्थ्यांना पदव्या वाटणारी वितरण केंद्रे एवढेच त्याचे स्वरूप राहणार, हे केव्हातरी आपण गांभीर्याने समजून घ्यायला हवे.
 या पार्श्वभूमीवर जगात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर दबदबा निर्माण करणारे हार्वर्ड विद्यापीठ वस्तुपाठ म्हणून अभ्यासायला हवे. हार्वर्ड विद्यापीठ पदव्या देते, पण संशोधनावर आधारित. अभ्यासक्रम पूर्तीनंतर पदवी प्रदान करण्याच्या पारंपारिक परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आपण बदलणे आवश्यक आहे. सन १६३६ साली स्थापन झालेले हे विद्यापीठ. इथे औषध (मेडिसीन), धर्म (Divinity), विधी, दंत चिकित्सा, कला, विज्ञान, व्यापार/उद्योग, विस्तार (Extension), रचना (Design), शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, अभियांत्रिकी इ. विद्याशाखांची स्वतंत्र

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१२०