पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाळांचा कल सहशिक्षणाचा आहे. मुले नि मुली एकत्र शिकवण्याचा सर्वत्र प्रघात आहे. निवासी, अनिवासी, धार्मिक, निधर्मी, राज्य सरकारी, केंद्रीय अशा विविध प्रकारच्या माध्यमिक शाळा कॅनडात आढळतात. पालकांना शाळा निवडण्याची मुभा आहे. इंग्रजी, फ्रेंच, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, आरोग्य, शारीरिक शिक्षण, नागरिकशास्त्र, रोजगार नियोजन व निवड (Career Studies) हे विषय तिथे शिकवले जातात. परीक्षा व मूल्यांकन पद्धती भिन्न असल्या, तरी राज्यस्तरीय, केंद्रीय अशा परीक्षा असतात. पदवी प्रवेश त्यावर अवलंबून असतो. वाचन, विज्ञान व गणित विषयातील कौशल्यावर तुमची गुणवत्ता विशेष मानण्यात येते. व्यक्तिगत लक्ष देण्याकडे कल असतो. विहीत पदवीधरच शिक्षक म्हणून निवडले जातात. शिक्षकांवर फौजदारी नसणे, आरोग्य सक्षम असणे बंधनकारक आहे, अशा छोट्या-मोठ्या गोष्टींतून कॅनडाने माध्यमिक शिक्षणात वर्चस्व स्थापन केले आहे. वैविध्य ठेवूनही गुणवत्ता आणता येते हे कॅनडाने जगाला दाखवून दिले आहे.
उच्च शिक्षण
 भारतीय शिक्षण व्यवस्थेची मोठी गंमत आहे, 'पाया भुसभुशीत, कळस चकचकीत' असे तिचे सार्थ वर्णन करता येईल. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तर सुमार असताना उच्च शिक्षणास मात्र विश्व मान्यता (मानांकन नव्हे!) का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याची कारणमीमांसा करता लक्षात येईल की भारतीय विद्यार्थी उपजत प्रगल्भ आहेत. खालच्या शिक्षण स्तरांची गुणवत्ता वाढवली तर भारताचे मनुष्यबळ कुशल व रोजगार उपयुक्त बनवणे शक्य आहे. उच्च शिक्षण स्तरावर ज्या नियंत्रक संस्था आहेत त्या किमान वा अपेक्षित दर्जा, सुविधा, संलग्नता अटीत सवलत देत नसल्याने उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावतो आहे. विशेषतः माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरी जगमान्य आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ, नॅक, संलग्नता / मान्यता देणाच्या राष्ट्रीय संस्थांचे कार्य प्रशंसेस पात्र आहे. अपवाद वैद्यकीय, शिक्षण परिषदा. शिक्षण दर्जा नसण्याचे हे सबळ कारण.
 उच्च शिक्षणात खासगी संस्थांचे प्राबल्य व नियंत्रण हेही त्याचे एक कारण होय. पण त्याच संस्थांच्या शाळा मात्र ही गुणवत्ता देत नाही. याचे कारण रचना व आराखड्यातच खोट आहे किंवा निरीक्षक नियंत्रण यंत्रणा (शिक्षण खाते) कमजोर आहे. विदेशी विद्यार्थी भारतात येतात ते आफ्रिका, आशिया खंडातून म्हणजे अविकसित वा विकासशील देशातून.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११९