पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संस्थाने असून त्यांची समृद्ध संकुले विकसित आहे. सुमारे ८५ हेक्टर परिसरात केंब्रिज, बोस्टन आदि ठिकाणी ही विद्याकेंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राची वसतिगृहे, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, सुविधा केंद्रे आहेत. शिक्षक आंतर्राष्ट्रीय दर्जाचे व निमंत्रित (नियुक्त नव्हे!) असतात. केंद्रे उपग्रह संलग्न आहेत. विद्यार्थी निवडीत संगणक साक्षरता ही मुख्य अट आहे. शिक्षणात कृती, सर्वेक्षण, निरीक्षण, निष्कर्ष, प्रकल्प, प्रकाशन, प्रगटीकरण, सादरीकरण, गट चर्चा, चर्चासत्रे यावर भर असतो. निरंतर मूल्यमापन, क्रेडिट पद्धत आहे. उच्च माध्यमिक (पदवीपूर्व), पदवी, पदव्युत्तर, संशोधन, उच्च संशोधन स्तरावर प्रमाणपत्रे, पदव्या प्रदान केल्या जातात. मूल्यमापनात पारदर्शितेस सर्वाधिक महत्त्व असते. सर्वाधिक नोबेल विजेता, शास्त्रज्ञ, लेखक, विश्वमान्य राजनीतिज्ञ, उद्योगी, व्यापारी, प्रशासक, संशोधक निर्माण करणारे हे विद्यापीठ. त्यांच्या या परंपरेमुळेच विद्यापीठास ३२ अब्ज डॉलर्सच्या वार्षिक देणग्या (वर्षासने) मिळतात व त्यातून विद्यापीठ चालते. हे निवासी संशोधन विद्यापीठ म्हणून अग्रमानांकित आहे.

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१२१