पान:देशी हुन्नर.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८४ ]
तांबे, पितळ, जस्त, कयील, कासें इत्यादि प्रातूचीं भांडी.

 विलायतेस स्वयंपाक करण्यास लोखंडाची भांडीं व जेवण्यास चिनई बरण्यांसारखी मातीची भांडीं वापरण्याची रीत असल्यामुळें त्या देशांत तांबे व पितळ या धातूचा विशेष खप नाहीं. आमच्या देशाची स्थिति अशी नाहीं. आह्माला स्वयंपाकाला जेवणाला, देवपूजेला, पानसुपारीला, व हरएक कामाला तांब्या पितळेचीं भांडीं लागल्यामुळें सगळ्या देशभर जिकडे तिकडे त्यांचा खप आहे. तांबें व जस्त यापासून पितळ होते, व तांबे आणि कथील या पासून कांसें होते. काशास उत्तर हिंदुस्थानांत फूल ह्मणतात. स्वयपाकाचीं व पाणी पिण्याचीं भांडी नक्षीचीं नसताच इतकेंच नाहीं, तर तीं चांगल्या तऱ्हेनें स्वच्छ घांसतां यावीं म्हणून जितकीं साधीं ठेववतील तितकीं ठेवतात. आम्ही हिंदू लोक कल्हई लावलेलीं पितळेचीं भांडीं वापरतों. मुसलमानास आंत बाहेरून कल्हई केलेलीं तांब्याचीं भांडीं विशेष प्रिय आहेत.

 देवपूजेच्या भांडयांचा आकार वेगळ्या वेगळ्या प्रांतीं वेगवेगळाले आहेत. व तीं वेगळ्याला धातूंचीही करतात. बंगाल्यास देवपूजेचीं भांडी तांब्याची करितात. नाशिकास पितळेचीं करितात. देवपूजेची भांडीं करण्याच्या कामांत काशाचा उपयोग करीत नाहींत.

 समया, खंदील व इतर प्रकारचे दिवे हे मात्र काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत पितळेचेच होतात. देवाच्या मूर्ती तांब्याच्या, पितळेच्या व इतर धातूंच्याही करितात.

 बाबू त्रैलोक्यनाथ मुकरजी स्वतः कबूल करितात कीं अलीकडे बंगाल प्रांतांत एक नवीन तऱ्हेचें तांदूळ धुण्याचें भांडें प्रचारांत आलें आहे. पूर्वी त्या प्रांती बांबूच्या टोपल्यांतून तांदूळ धुण्याची चाल असे. ते ह्मणतात हें नवीन प्रकारचें “ विलक्षण ' भांडे कलकत्ता प्रदर्शनांत मुंबईहून गेलेंले होतें. त्याचें हें वर्णन आहे. या ' विलक्षण ' भांडयाचें नांव 'रोवळी' !!!

 मुंबई इलाख्यांतील बहुतेक मोठमोठ्या गांवीं तांब्यापितळेची भांडीं, ताशे, ढोल, साखळ्या, दिवे, वगैरे करणारे कासार आहेत. मुंबई, नाशिक, पुणें, सोलापूर, हुबळी, व शिहोर या गांवीं जितके होते इतके इतर कोठें ही होत नाहीं. त्यांत ही नाशिक व पुणे हे गांव विशेष प्रख्यात आहेत. नाशिक येथील